टेम्पो ट्रॅव्हल्सच्या धडकेत एकाचा मृत्यू; एकजण जखमी

0
363

चाकण, दि. २६ (पीसीबी) -टेम्पो ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात २४ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता आंबेठाण रोड, वराळे येथे घडला.

स्वप्नील अनाप असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संकेत दत्तात्रय खटके (वय २५, रा. चाकण) हे जखमी झाले आहेत. संकेत यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार धीरजसिंग ठोंगे (रा. मामुर्डी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकेत आणि त्यांचा मित्र स्वप्नील हे दुचाकीवरून वराळे गावातून जात होते. आंबेठाण रोडवर उतारावरून जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील गाडीने संकेत यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात स्वप्नील यांचा मृत्यू झाला. तर संकेत हे गंभीर जखमी झाले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.