तळेगांव, दि. 5 (पीसीबी)
टेम्पो ट्रॅव्हलरने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ४) सायंकाळी इंदोरी येथे घडली.
शिवाजी भगवान बिरगड (वय ३०) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी माधव भगवान बिरगड (वय ३३) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर भागवत चोपडे (वय ३०, रा. वडगाव मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ शिवाजी हा त्याची पल्सर दुचाकी घेऊन तळेगाव दाभाडे येथून चाकण येथे जात होता. त्यावेळी सागर चोपडे याने त्याच्या ताब्यातील टेम्पो ट्रॅव्हलरने शिवाजी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये शिवाजी यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.