चिखली, दि. २७ (पीसीबी) : टेम्पो चालकाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. २५) रात्री दहा वाजताच्या सुमारास ताम्हाणे वस्ती, चिखली येथे घडली.
रामेश्वर श्रीराम वायाळ (वय ३६, रा. देवभूमी सोसायटी, ताम्हाणे वस्ती, चिंचेचामळा, चिखली) असे मारहाणीत जखमी झालेल्या टेम्पो चालकाचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि. २६) याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उमेश आत्माराम शेळके (रा. लक्ष्मीनगर, वडमाव घेनंद रोड, आळंदी), दिनेश राजाराम आमले, आणि रितेश रमेश मिरगे ( दोघेही रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी वायाळ हे त्यांचा (एमएच १४ जेएल. ८४७०) हा टेम्पो घेऊन चालले होते. ते देवभुमी सोसायटी, चिंचेचामळा कॉर्नर, ताम्हाणे वस्ती, चिखली येथे आले असता वायाळ यांच्या ओळखीचा आरोपी उमेश आत्माराम शेळके याने फिर्यादी यांना हात गाडी थांबविण्यास सांगितले असता वायाळ यांनी गाडी थांबविली. आरोपी उमेश शेळके म्हणाला की, तुझा मेव्हणा शिवप्रसाद सरकटे याने माझे सासरे रमेश मिरगे यांचे टेम्पोतील लोणावळा येथून मटेरियल चोरले आहे, असे म्हणत फिर्यादी यांचा टेम्पोचा उजव्या बाजूचा दरवाजा उघडला. तुला सगळे माहीत असून तू मुद्दाम असे बोलतोय, असे म्हणत फिर्यादी यांची गचुंडी पकडून खाली ओढून हाताने व लाथा बुक्क्याने मारहान केली. दिनेश आमले याने फिर्यादी यांना पकडून रितेश रमेश मिरगे याने शिवीगाळ करीत त्याच्या हातातील काठीने फिर्यादी यांना मारहाण केली. माझ्या वडीलांना मारल्याचा मी बदला घेतला आहे, तुला कोठे जायचे तेथे जा, तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.