बावधन, दि. 05 (पीसीबी) : टेम्पोने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील पती-पत्नी जखमी झाले. हा अपघात 29 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री मुंबई-बेंगलोर महामार्गावर बालेवाडी येथे घडला. वैभव भीमराव अनपट (वय 26, रा. रावेत) यांनी याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वैभव आणि त्यांच्या पत्नी दुचाकीवरून मुंबई-बेंगलोर महामार्गाने जात होते. बालेवाडी मधील सरोवर हॉटेल समोर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका टेम्पोने धडक दिली. या अपघातात वैभव यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. तर त्यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या. या अपघातामध्ये वैभव यांची दुचाकी, लॅपटॉप आणि मोबाईल फोनचे नुकसान झाले आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.