टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
90

पिंपरी, दि.४ (पीसीबी)

भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना तळेगाव चाकण रोडवर सोमवारी (दि. 2) दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास घडली.

नवजीवन विनायक राऊत (वय 32, रा. माणिकवाडा, ता. आष्टी, जि. वर्धा) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत त्यांचे नातेवाईक राहूल जगन्नाथ गावंडे (वय 44, रा. आंबेगाव, पुणे) यांनी मंगळवारी (दि. 3) याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय पोपट मालगावे (वय 39, रा. वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत नवजीवन हे आपल्या दुचाकीवरून तळेगाव चाकण रोडने चालले होते. ते सदुंबरे गावाजवळील पुलावर आले असता त्यांच्या दुचाकीला आरोपी मालगावे चालवत असलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी होऊन नवजीवन यांचा मृत्यू झाला. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.