येलवाडी फाटा, दि. ७ (पीसीबी) – भरधाव टेम्पोने एका दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 5) रात्री पावणे दहा वाजता येलवाडी फाटा ते देहूफाटा येथे घडली.
शामकांत संजय पाटील (वय 26, रा. देहूगाव) असे जखमी दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र बाळू पाटील (वय 29, रा. देहूगाव) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो (एमएच 46/एएफ 0056) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र शामकांत हे देहूफाटा ते येलवाडी रस्त्याने दुचाकीवरून जात होते. साईराज चौकाजवळ त्यांच्या दुचाकीला आरोपीच्या ताब्यातील टेम्पोने भरधाव वेगात येऊन जोरात धडक दिली. त्यामध्ये शामकांत हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती न देता तसेच अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात न नेता आरोपी टेम्पो चालक पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.