टीसीएसने थांबवली H-1B नियुक्ती; स्थानिक कर्मचाऱ्यांवर भर देणार CEO कृतीवासन यांची घोषणा

0
6

दि.१३(पीसीबी)-टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे सीईओ के. कृतीवासन यांनी स्पष्ट केलं आहे की, कंपनी आता नव्या H-1B व्हिसा धारकांची भरती करणार नाही. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितले की, “आमच्याकडे युएस मध्ये आधीच पुरेसे H-1B व्हिसा धारक कर्मचारी आहेत. त्यामुळे सध्या नवीन भरतीची गरज वाटत नाही.टीसीएस ही अमेरिकेत H-1B व्हिसा धारकांची सर्वाधिक भरती करणारी भारतीय आयटी कंपनी असून, 2009 ते 2025 दरम्यान त्यांनी तब्बल 98,259 H-1B धारकांना नोकरी दिली आहे. फक्त 2025 मध्येच 5,505 H-1B नियुक्त्या टीसीएसने केल्या होत्या, ज्यामध्ये टीसीएसने मायक्रोसॉफ्ट, मेटा, अ‍ॅपल आणि गुगल यांनाही मागे टाकले.

कृतीवासन पुढे म्हणाले, “आमचा नेहमीच उद्देश होता की H-1B वर पाठवलेले कर्मचारी एक ठराविक कालावधीनंतर परत यावेत आणि स्थानिक कर्मचार्‍यांशी बदल करण्यात यावा. आता आमचा भर स्थानिक सहभाग वाढवण्यावर आहे.”लॅटिन अमेरिका, मध्यपूर्व व एशिया-पॅसिफिकसारख्या भागात टीसीएस स्थानिक कर्मचाऱ्यांवरच काम करत असून, कृतीवासन यांनी यावर जोर दिला की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) नवीन युगात ग्राहकांसोबत जवळून काम करण्यासाठी वैविध्यपूर्ण कौशल्यांची गरज भासणार आहे, आणि म्हणूनच स्थानीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जाणार आहे.

H-1B पेक्षा L-1 व्हिसाकडे वळण्याची शक्यता

उद्योग विश्लेषकांचा अंदाज आहे की, TCS च्या या निर्णयामुळे H-1B व्हिसाची मागणी मोठ्या प्रमाणावर घटणार आहे. हैदराबादमधील कन्सल्टन्सी मॅनेजर एम. दिनेश यांनी सांगितले, “TCS च्या CEO ने जाहीरपणे H-1B भरती बंद केल्याचं सांगितल्यावर, इतर कंपन्या जसं की Amazon, Cognizant, Microsoft इत्यादीही हाच मार्ग स्वीकारतील.”ते पुढे म्हणाले की, “ज्या कंपन्यांचे भारतात कार्यालय आहे, त्या भविष्यात अमेरिकेतील ऑनसाइट गरजा L-1 व्हिसाद्वारे इंट्रा-कंपनी ट्रान्सफर करून पूर्ण करतील. H-1B साठी लागणारा सुमारे $1,00,000 खर्च टाळण्यासाठी हे पाऊल अधिक व्यवहार्य ठरेल.”