टीव्ही बंद केला म्हणून सूनेने सासूची बोटं कापली

0
223

देश,दि.०९(पीसीबी) – अनेक वेळ क्षुल्लक कारणांवरून मारहाण किंवा हत्येच्या बातम्या आपल्या कानावर पडतात. अशीच काहीशी घटना ठाण्यामध्ये घडली आहे. टीव्ही बंद करण्याच्या रागातून चक्क सूनेने सासूच्या हाताची बोटं कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यातील अंबरनाथ येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. सून टीव्ही बघत असताना सासूने टीव्ही बंद केला, सूनेला याचा राग आला. रागाच्या भरात सूनेने सासूच्या हाताची तीन बोट कापली इतकंच नाही, तर सोडवताना मधे आलेल्या पतीलाही मारहाण केली. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.

ठाण्यातील अंबरनाथ येथे सोमवारी ही घटना घडली. पीडित सासूचं वय 60 वर्षे तर सुनेचं वय 32 वर्षे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरात सासू पूजा करत होती आणि देवाचं भजन गात होती. त्यावेळी सून मोठ्या आवाजात टीव्ही पाहत होती. यावेळी सासूला पूजा करताना त्रास होत असल्याने सासूने सुनेला टीव्ही बंद करण्यास किंवा किंवा आवाज कमी करण्यास सांगितलं, मात्र सूननं त्याकडे दुर्लक्ष केले. यानंतर सासूने स्वत: उठून टीव्ही बंद केला, हे वादाचे कारण बनले.

टीव्ही पाहत असताना सासूनं टीव्ही बंद केल्याने सूनेला राग अनावर झाला. या रागाच्या भरात सूनेनं सासूवर धारदार शस्त्रानं हल्ला करत सासूच्या हाताची तीन बोटं छाटली. या धक्कादायक घटनेनं घरातील व्यक्तींसह आजूबाजूच्या परिसरातही खळबळ माजली आहे.

टीव्ही बंद केल्यामुळे सुनेला खूप राग आला. तिने सासूच्या हाताची तीन बोटं कापली. सासू आणि सूनेमधील वाद वाढत असल्याचे पाहून मुलगाही मदतीला आला. मात्र महिलेनं तिच्या पतीच्याही कानशिलात लगावली. याप्रकरणी सासूने शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पीडितेच्या जबानीवरून आणि हाताची छाटलेली बोटं पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.