चिखली, दि. १६ – चिखली, कुदळवाडी भागामध्ये टीपी स्कीम राबवण्याचा घाट पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने घालण्यात आला होता. या भागातील हजारो एकर जागेमध्ये आरक्षणे टाकून यामध्ये महापालिकेच्या प्रकल्प योजना राबवण्याचे प्रस्तावित होते. मात्र या स्कीम विरोधात येथील भूमिपुत्रांनी जोरदार लढा दिला. संघर्षाची भूमिका ठेवली. अखेर प्रशासनाला यामुळे दोन पाऊल मागे यावे लागले. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या वतीने चिखली कुदळवाडीतील प्रस्तावित टीपी स्कीम रद्द करण्यात आली असून यानंतर येथील ग्रामस्थ, भूमिपुत्रांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली. फटाक्यांची आतिषबाजी करत संपूर्ण गावाने एकमेकांना पेढे भरवले.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा शहर विकास आराखडा नुकताच जाहीर करण्यात आला. या शहर आराखड्यात व्यतिरिक्त चिखली कुदळवाडी आणि चऱ्होली या भागामध्ये टीपी स्कीम राबवण्याचा प्रस्ताव होता. मात्र या टी पी स्कीम विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्र घेतला. बांगलादेशी घुसखोर असल्याचे सांगून तीन महिन्यापूर्वी ४५०० अतिक्रमणे भुईसपाट केली होती. प्रत्यक्षात ती कारवाई टीपी स्किमसाठी होती असे लक्षात आल्याने ग्रामस्थ संतापले होते.
आमचा जीव गेला तरी बेहत्तर पण “टीपी” होऊ देणार नाही, अशा अत्यंत कठोर शब्दांत ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या होत्या. महापालिका प्रशासनाचा निषेध म्हणून टीपी स्किम बाबत महापालिकेने दिलेल्या जाहीर प्रकटनाची होळी यावेळी करण्यात आली होती. यानंतर ग्रामस्थांचा आक्रमक विरोध संघर्षाची ठिणगी पाहून प्रशासन दोन पाऊल मागे आले आहे.नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत शहर विकास आराखड्याला मंजुरी देत टीपी स्कीम चा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे.
दरम्यान हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर चिखली कुदळवाडीतील ग्रामस्थांनी अक्षरशः दिवाळी साजरी केली. संपूर्ण गावाने एकमेकांना पेढे भरवत तोंड गोड केले. फटाक्यांच्या जोरदार आतिशबाजी देखील यावेळी करण्यात आली.चिखली कुदळवाडीच्या जमिनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात गेल्या. महापालिकेच्या आरक्षणातही मोठे क्षेत्र गेले आहे. स्वस्त घरकूलासाठी १०० एकर क्षेत्र घेतले. यापूर्वीच या भागातील रस्त्यांसाठी देखील जमीन संपादित करण्यात आली. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने कुदळवाडी चिखली परिसरातच जागा शिल्लक असताना अतिक्रमणांच्या नावाखाली कुदळवाडी आणि आसपासची अनेक गावातील जमिनीवर बुलडोझर फिरवला. त्यामुळेच टीपी स्कीम बाबत ग्रामस्थांचा विरोध होता ग्रामस्थांची लढाई अखेर यशस्वी ठरल्याच्या भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.