टीडीआर प्रकरणी महापालिका प्रशासनाच्या डोळ्यांना झापडे.

0
200

संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाला महिना लोटला;चौकशी बाबत प्रशासनाची उदासीनता

पिंपरी, दि. ०९ (पीसीबी) – वाकड येथील टीडीआर मध्ये गैरव्यवहार करण्यासाठी अग्रेसर राहिलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड व इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने साखळी उपोषण सुरु केले आहे. त्याला एक महिना उलटूनही चौकशी बाबत प्रशासनाची उदासीनता दिसत आहे.अधिकाऱ्यावर कारवाई करण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या झोळयांना झापडे आले असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात केला.

वाकडमधील आरक्षित भूखंड खासगी विकासक मे.विलास जावडेकर इन्फिनिटी प्रा.लिमिटेड या खाजगी संस्थेस विकसित करण्यासाठी देऊन शासकीय नियमांची पायमल्ली करण्यात आली,यामध्ये दीड हजार कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा झाल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी केला होता.कथित टीडीआर घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड व इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी,यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापालिका प्रवेशद्वारावर सहा फेब्रुवारी पासून बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे.

या आंदोलनात शहराध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते,कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण,उपाध्यक्ष वैभव जाधव, सचिव रावसाहेब गंगाधरे, संघटक वसंत पाटील,मावळ तालुका अध्यक्ष आदिनाथ मालपोटे,संतोष शिंदे,अभिषेक गायकवाड आदी आंदोलनात सहभागी आहेत.

सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले की,टीडीआर मधून गैरव्यहार करून,चुकीचे काम करून स्वतःच्या तुंबड्या भरून घेण्याचा मानस पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड व इतर अधिकाऱ्यांचा होता.मात्र ऐनवेळी त्याचे बिंग फुटले. विधानसभेत विरोधी पक्षनेत्यांनी त्याविरोधात आवाज उठवीला. त्यानंतर हे प्रकरण सर्वांसमोर आले.संबंधित अधिकारी गायकवाड व इतर अधिकारी यांच्या अंकलट प्रकरण आल्यानंतर अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली.हे प्रकरण दडपण्यासाठी सर्वच भ्रष्ट अधिकाऱ्यांनी धडपड सुरु केली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याची दखल न घेतल्याने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर संभाजी ब्रिगेडच्या वतीने.सहा फेब्रुवारी पासून साखळी उपोषण सुरु केले आहे.मात्र त्या आंदोलनाची दखल घेण्याची सहानूभूती देखील महापालिका प्रशासनाने दाखवलेली नाही.या वरून महापालिका प्रशासन नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड व इतर दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे सिद्ध होत आहे.महापालिका प्रशासनाने या अधिकाऱ्यांना पायघड्या न घालता त्यांच्यावर कारवाई करावी.अन्यथा आगामी काळात संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असा इशारा सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात दिला