– संभाजी ब्रिगेडचे सतिश काळे यांचा इशारा
पिंपरी, दि. २७ (पीसीबी): पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकडमधील आरक्षित भूखंड खासगी विकसकाला विकसित करण्यासाठी देऊन शासकीय नियमांची पायमल्ली करत यामध्ये दीड हजार कोटी रुपयांचा टीडीआर घोटाळा करण्यात आला. यामुळे महापालिका प्रशासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात पिंपरी चिंचवड महापालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांची मुख्य भूमिका असून तेच या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. त्यामुळे येत्या दहा दिवसांत प्रसाद गायकवाड यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे अन्यथा महापालिका प्रशासना विरोधात संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन छेडले जाईल,असा इशारा संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिला आहे.
याबाबत सतिश काळे यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकतेच टीडीआर घोटाळ्यात संशय घ्यायला जागा आहे, असे वक्तव्य केले आहे. तर समावेशक आरक्षण विकसीत करताना टीडीआर वाटपाचे जे नियम दिलेले आहेत त्याचा सरळ सरळ भंग केला असल्याचे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेला दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.याबाबत हिवाळी अधिवेशनामध्येही चर्चा झाली. या संपूर्ण प्रकारामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची नाहक बदनामी होत आहे. प्रशासन काळात महापालिकेच्या तिजोरीवर हा सर्वात मोठा दरोडा घालण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.या आर्थिक गैरव्यवहाराची आम्ही अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) तक्रार केलेली आहे. येत्या काळात या प्रकरणाची चौकशी होईलच. भ्रष्टाचार हा चांगल्या प्रशासनाचा आणि विकासाचा शत्रू आहे. प्रशासन आणि जनतेने मिळून भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे राष्ट्रव्यापी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. परंतू खुद्द प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनच कायदा कशा प्रकारे धाब्यावर बसवून शासनाची फसवणूक करण्यात आली, याचे हे मोठे उदाहरण म्हणता येईल. हा संपूर्ण ‘भूखंडाचा श्रीखंड’ खाण्याचा प्रकार आहे.पदाच्या जबाबदा-या व कर्तव्ये ज्ञात असतानाही कामकाजात तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्याला सेवेत ठेवणे अत्यंत चुकीचे आहे.त्यामुळे टीडीआर घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार तसेच नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड यांना सेवेतून तात्काळ निलंबीत करण्यात यावे तसेच त्यांच्या कार्यकाळातील सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी,अशी मागणी सतिश काळे यांनी केली आहे.