पिंपळे सौदागर, दि. १४ (पीसीबी) – टास्क पूर्ण केल्यास अधिकचा मोबदला मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल एक कोटी 10 लाख 71 हजार 382 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 22 जुलै 2023 ते 13 मार्च 2024 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.
दीपक राजू रडे (वय 44, रा. पिंपळे सौदागर) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमन सचदेव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने टेलिग्राम वरून फिर्यादी यांच्याशी संपर्क केला. आरोपी महिला आणि तिच्या साथीदारांनी फिर्यादी यांना वेळोवेळी टेलिग्रामवरून टास्क दिले. टास्क पूर्ण केल्यास अधिकचा मोबदला मिळेल, असे त्यांना आमिष दाखवण्यात आले. फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांची तब्बल एक कोटी 10 लाख 71 हजार 382 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.