टाळगाव चिखली संतपीठाच्या प्रथम पुस्तिका अक्षर संस्कारचा प्रकाशन सोहळा उत्साहात

0
385

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – टाळगाव चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपिठाच्या माध्यमातून केवळ शिक्षण नव्हे; तर संस्कारित विद्यार्थी घडवायचे आहेत. सध्या येथे पाचवीपर्यंत शिक्षण उपलब्ध असेल तरी पदवीपर्यंत शिक्षण आम्ही देणारच आहोत. एवढ्यावरच न थांबता अगदी पी. एचडी आणि त्यापुढीलही शिक्षण देण्याचे संचालक मंडळाचे ध्येय आहे. शिक्षण घेण्यासाठी भविष्यात देशातीलच नव्हे तर जगातील विद्यार्थी येतील, असा विश्वास साहित्य व संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा संतपीठचे संचालक डॉ. सदानंद महाराज मोरे यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टाळगाव चिखली आयोजित प्रथम पुस्तिका अक्षर संस्कार याचे प्रकाशन शनिवारी (दि. ११) भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. मोरे बोलत होते.

या कार्यकमाचे अध्यक्षस्थान साहित्य व संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष तथा संतपीठ चे संचालक ह.भ.प. डॉ. सदानंद महाराज मोरे यांनी भुषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा संतपीठचे अध्यक्ष मा. राजेश पाटील यांनी केले.

या कार्यक्रमासाठी जगदगुरू संत तुकाराम महाराज संतपीठ शाळा अँड ज्युनियर कॉलेजचे संचालक तथा उपायुक्त संदीप खोत, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, दिनकरशास्त्री भुकेले, संचालिका डॉ. स्वाती मुळे, संचालक राजू महाराज ढोरे, अभय टिळक यांसह अभ्यासक समिती, सांस्कृतिक समिती आणि सल्लागार समिती, चिंतन समिती चे सदस्य, संतपीठ शाळेचे पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हे पुस्तक तयार करण्यासाठी व प्रकाशनासाठी सर्व समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

ह.भ.प. डॉ. सदानंद मोरे यांनी पुस्तकाच्या माध्यमातून संतसाहित्याची परंपरा आणि मुल्ये यांचा वारसा आपण विद्यार्थांकडे सुपूर्त करीत आहोत असे आपल्या भाषणात नमुद केले. प्राचार्या डॉ. मृदुला महाजन यांनी संतपीठ शाळेच्या अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.

यानंतर श्रुती तनपुरे यांची सरस्वती वंदना झाली. दरम्यान रसिका जोशी, डॉ. स्वाती मुळे आणि सहकारी यांनी अत्यंत अप्रतिम असे कथ्थक नृत्य सादर केले.

आजच्या पिढीला सकस शिक्षणाची गरज आहे. संतपीठ हे आगामी काळात देशाला नव्हे तर जगाला दिशा देईल, असे विचार प्रा. विजय नवले यांनी करिअर मार्गदर्शन करताना मांडले.

चौकट – संत साहित्याचे विचार मनावर रुजले – राजेश पाटील

आयुक्त राजेश पाटील यांनी अक्षर संस्कार पुस्तिकेचा गौरव केला. ते म्हणाले की, आधुनिकता आणि परंपरेचा मिलाफ साधत संत पिठामध्ये जो शिक्षण देण्याचा मानस आहे त्यातून येणाऱ्या पिढीचे भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल. माझ्या लहानपणी मी कीर्तने ऐकली आहेत. माझ्या स्वतःच्या घडण्याला त्याचा खूप फायदा झाला. त्यावेळी मनावर रुजलेले विचार अजूनही आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अभय टिळक यांनी केले. ह.भ.प. राजू महाराज ढोरे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला, तसेच डॉ. स्वाती मूळे यांनी सर्वांचे आभार मानले.