टाटा मोटर्स कलासागर’मुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या कलागुणांना वाव – राजेश खत्री

0
309

पिंपरी दि. १८ (पीसीबी) -चिंचवड, 17 ऑगस्ट – टाटा मोटर्स कलासागर या संस्थेने गेल्या पन्नास वर्षात कंपनीतील सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणण्याचे तसेच त्यांच्यातील सृजनशीलता जोपासत त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे मोठे काम केले आहे, असे टाटा मोटर्सच्या पॅसेंजर व्हेईकल बिजनेस युनिटचे (पीव्हीबीयू) ऑपरेशन हेड राजेश खत्री म्हणाले.

टाटा मोटर्स कंपनीची सांस्कृतिक शाखा असलेल्या टाटा मोटर्स कलासागर या संस्थेच्या सुवर्ण महोत्सवनिमित्त आयोजित तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन श्री खत्री यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या या समारंभास कंपनीच्या कमर्शिअल व्हेईकल बिजनेस युनिटचे (सीव्हीबीयू) प्रकल्प प्रमुख अलोक कुमार सिंग, मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख पी. श्रीनिवासन, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष संतोष दळवी, टाटा मोटर्स कलासागरचे अध्यक्ष सुनील सवाई, सरचिटणीस रोहित सरोज आदी मान्यवर उपस्थित होते.

खत्री यांनी त्यांच्या भाषणात कलासागरच्या पूर्ण टीमचे 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की, या तीन दिवसीय महोत्सवाचा उद्देश समविचारी माणसांना व टाटा उद्योगसमूहाच्या मूल्यांप्रमाणे चालणाऱ्या बिगर सरकारी संस्था यांना (एनजीओ) एकत्र आणणे आहे.

कलासागरचे कौतुक करताना ते म्हणाले की कलासागरमुळे आमच्या कंपनीतील सहकारी व त्यांच्या कुटुंबियांना एकत्र आणून त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला आहे. इतकी वर्षे टिकून चिकाटीने राहणे व सुवर्णं महोत्सव साजरा करणे हे या प्रवासातील सहभागी लोकांचे समर्पण, वचनबद्धता व सर्जनशीलता यामुळे शक्य झाले आहे. आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे तर कलासागर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. हा एक योगायोग नसून यातून देशाच्या नेतृत्वाचे व श्री सुमंत मूळगावकर यांचे आदर्श व तत्वे दिसतात. आपली कंपनी ही श्री रतन टाटा यांच्या नेतृत्वात त्यांच्या आदर्श व तत्त्वांवर चालत आहे.

श्री. संतोष दळवी म्हणाले की, “हे स्पर्धात्मक युग आहे. यामध्ये आपण थोडे रिलॅक्स राहणे आपल्या कलागुणांना वाव देणे हे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक कामगार बंधू-भगिनींमध्ये दडलेला जो कलाकार जागृत करण्यात कलासागरला यश आले तर आमच्यासाठी ती सर्वात अभिमानास्पद गोष्ट असेल.”

श्री. सुनील सवाई म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी कलासागरची स्थापना टाटा मोटर्सच्या कामगारांसाठी झाली होती. 50 वर्षामध्ये दोन ते तीन पिढ्या होतात. कलासागर ही संस्था त्यांच्या बरोबर जोडली गेली आहे. ही संस्था टाटा संस्कृतीशी जोडली गेली आहे. ती नुसतीच जुडली नाही तर ती स्वतः ही वाढत आहे व टाटा कंपनीची वाढ करत आहे. कलासागरच्या यशामध्ये कंपनीचे व्यवस्थापन व टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचा फार मोठा वाटा आहे.

तीन दिवसीय महोत्सवात दररोज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये दोन सत्रे आहेत. सकाळी 9.30 ते दुपारी 4 वा पर्यंत कार्यक्रम हे सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले आहे आणि संध्याकाळी 6 वा ते 9 वा पर्यंतचे कार्यक्रम कर्मचारी, त्यांचे नातेवाईक तसेच निमंत्रितांसाठी असतील. या महोत्सवात कला प्रदर्शन, विविध गुणदर्शन, एकांकिका, समूह नृत्य स्पर्धा, स्मरणिका प्रकाशन, ऑर्केस्ट्रा व इतर कार्यक्रम होतील.