टाटा मोटर्स कलासागर’ने कर्मचाऱ्यांच्या अंगभूत कलागुणांना व्यासपीठ दिले – गिरीश वाघ

0
334

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – टाटा मोटर्सच्या कलासागर या सांस्कृतिक शाखेमुळे गेल्या 50 वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांच्या अंगभूत कलागुणांना हक्काचे व्यासपीठ दिले, या शब्दांत टाटा मोटर्सच्या कमर्शियल व्हेईकल बिझनेस युनिटचे (सीव्हीबीयू) कार्यकारी संचालक गिरीश वाघ यांनी ‘कलासागर’चे कौतुक केले.

टाटा मोटर्स कलासागरच्या सुवर्ण महोत्सव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. त्यावेळी टाटा मोटर्सच्या पुणे येथील प्रकल्पाचे(सीव्हीबीयू) प्रमुख आलोक कुमार सिंह, मनुष्यबळ विकास विभागाचे उपाध्यक्ष सीताराम कांदी, उत्पादन विभागाचे उपाध्यक्ष विनय पाठक, ऑपरेशन विभागाचे उपाध्यक्ष अजॉय लाल, टाटा मोटर्स कलासागरचे अध्यक्ष सुनिल सवाई, सरचिटणीस रोहित सरोज आदी मान्यवर उपस्थित होते.

कलासागरला 20 ऑगस्ट 2022 ला 50 वर्षे पूर्ण होतात त्यामुळे तीन दिवसीय महोत्सव 17 ते 19 ऑगस्ट चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. टाटा मोटर्स कलासागरच्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

गिरीश वाघ म्हणाले की, टाटा मोटर्स पुणे प्रकल्पाचे संस्थापक सुमंत मूळगावकर यांच्या दूरदृष्टीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील ओसाड माळरानावर उभी राहिलेली ही कंपनी फक्त व्यवसाय न करता विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. त्यांच्या प्रयत्नातून कलासागर ह्या सांस्कृतिक शाखेची स्थापना झाली. ही संस्था गेली 50 वर्षे कर्मचाऱ्यांच्या अंगभूत कलागुणांना हक्काचे व्यासपीठ देत आहे.

टेल्को व टाटा मोटर्सला सुमंत मूळगावकर यांच्यासारखा द्रष्टा नेता लाभला ते आमचे भाग्य आहे. जमशेदपूर नंतर पुणे येथे या प्लांटची स्थापना करताना त्यांनी दूरदृष्टीने विचार केला होता. त्यांनी त्यावेळेस असलेल्या ओसाड जमिनीवर हा औद्योगिक कारखाना सुरु केला. तसेच पुरवठादार कंपन्या सुद्धा येथे उभारण्यासाठी मदत केली. त्यांनी येथे वृक्ष लागवड करून या औद्योगिक मरूस्थळात हिरवळ निर्माण केली. त्याकाळी सक्ती नसताना देखील सीएसआर (कॉर्पोरेट सोशयल रिस्पॉन्सिबीलिटी) विभाग सुरु करून समाजोपयोगी उपक्रम राबवले, याकडे वाघ यांनी लक्ष वेधले.

कलासागर च्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त तयार केलेला लोगो हा आधुनिकतेची फार सुंदर कलाकृती आहे, अशी प्रशंसा देखील त्यांनी केली.

कलासागरचे कौतुक करताना आलोक कुमार सिंह म्हणाले की, कलासागर ही संस्था आमच्या कर्मचाऱ्यांना आपल्या संस्कृतीशी जोडण्यासाठी संधी देते. या संस्थेने अनेक चांगले कलाकारही दिले आहेत. तत्कालीन चेअरमन सुमंत मूळगावकर आणि श्रीमती लीला मूळगांवकर यांनी या संस्थेची सुरुवात केली व गेल्या 50 वर्षात खूप सारे मापदंड तयार केले आहेत. औद्योगिक वातावरणात काम करणारी ही एक अनोखी संस्था आहे. ती कर्मचाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक प्रतिभेच्या विकासासाठी उत्तम संधी देते. जनसंवाद व जनजागृतीची गरज असते, तेव्हा ही संस्था पथनाट्य व संगीताद्वारे जनमानसापर्यंत पोहचवते.

आता पर्यंत कलासागर ही संस्था फक्त टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांपूर्ती मर्यादित होती पण आता तिच्या सीमांचा विस्तार करत आहोत. या तीन दिवसीय महोत्सवाच्या निमित्ताने कला व संस्कृती मध्ये योगदान दिले आहे अशा बाहेरच्या समविचारी संस्थांनाही बोलावले आहे, असे त्यांनी सांगितले.

कलासागर टेक्निकल टीमने कलासागर च्या 50 वर्षांच्या वाटचालीची यशोगाथा दाखवणारे गाणे तयार केले आहे. त्याचे प्रकाशन श्रीमती दीपाली वाघ व श्रीमती भारती लाल यांनी केले. कलासागरच्या आतापर्यंतच्या माजी अध्यक्ष व सरचिटणीस यांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला पल्स पोलिओ मोहिमेत लहान मुलांना पोलिओ ड्रॉप्स देण्यामध्ये मदत केलेल्या 7 स्वयंसेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

अजॉय लाल यांनी आभार मानले तर रोहित सरोज यांनी सूत्रसंचालन केले.
तीन दिवसीय महोत्सवात 17 ते 19 ऑगस्ट दररोज सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत कार्यक्रम झाले. यामध्ये दोन सत्रे होती. सकाळी 9.30 ते दुपारी 4 वा पर्यंत कार्यक्रम हे सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले होते आणि संध्याकाळी 6 वा ते 9 वा पर्यंतचे कार्यक्रम कर्मचारी, त्यांचे नातेवाईक तसेच निमंत्रितांसाठी होते. या महोत्सवात कला प्रदर्शन, विविध गुणदर्शन, एकांकिका, समूह नृत्य स्पर्धा, स्मरणिका प्रकाशन, ऑर्केस्ट्रा व इतर कार्यक्रम झाले.