निगडी, दि. 4 ऑगस्ट (पीसीबी) – निगडी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक 28 मधील ज्ञानेश्वर गार्डन समोर एका टाकीत श्वान अडकला. ही घटना शनिवारी (दि. 3) रात्री घडली. टाकीत अडकलेल्या श्र्वानाला अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवनदान दिले.
याबाबत माहिती अशी की, शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास निगडी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक 28 मधील ज्ञानेश्वर गार्डन समोर एका टाकीत श्वान अडकला असल्याची वर्दी प्राधिकरण उप अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार प्राधिकरण उप अग्निशामक केंद्रातील प्रमुख अग्निशामक विमोचक मिलिंद पाटील, फायरमन संजय महाडिक, फायरमन अनिल माने, वाहन चालक राजेश साकळे, ट्रेनि फायरमन साहिल देवगडकर, शिवाजी पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पाण्याच्या टाकीत श्वान पडला होता. त्याला टाकीतून वरती येता येत नव्हते. जवानांनी दोरीच्या सहाय्याने श्वानाला बाहेर काढले. वेळीच मदत मिळाली म्हणून श्र्वानाचा जीव वाचल्याने स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार व्यक्त केले.