टक्केवारी मुक्त पालिका करण्यासाठी आप सर्व जागा लढविणार – हरिभाऊ राठोड

0
274

पिंपरी, दि.१०(पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेला टक्केवारीचे ग्रहण लागले आहे. पालिकेला टक्केवारीमुक्त करण्यासाठी आम आदमी पार्टी आगामी महापालिका निवडणुकीत सर्व जागा लढविणार असल्याची घोषणा ‘आप’चे राज्य उपाध्यक्ष, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आज (सोमवारी) केली.

राठोड यांची पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रभारीपदी नेमणूक करण्यात आल्यानंतर राठोड यांचा पहिला दौरा झाला. पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांबरोबर निवडणुकीसंदर्भात आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्य प्रवक्ते मुकुंद कीर्दत, पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष अनुप शर्मा, कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे आदी उपस्थित होते. राठोड म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेला भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या जाचातून मुक्त करण्यासाठी आम आदमी पार्टी आगामी निवडणुका लढणार आहे. दिल्ली आणि पंजाब प्रमाणे सामान्य नागरिकांच्या पाठिंब्यावर पिंपरी-चिंचवड मध्ये सत्ता हस्तगत करू. कारण भल्या भल्या प्रस्थापितांना धूळ चारण्याची किमया ही सर्व सामान्य नागरिकांनी निवडणूक हातात घेतल्यानंतर होत असते.

भारतीय संविधानाची अंमलबजावणी हाच आमचा जाहीरनामा असून त्यादृष्टीने कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवून मोफत दर्जेदार शिक्षण, मोफत उत्कृष्ट आरोग्य सुविधा, विद्यार्थी आणि महिला यांना मोफत बस प्रवास हे आमचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ असणार आहे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंतच्या सर्व प्रकल्पांचे महालेखापाल CAG मार्फत चौकशी करून भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई केली जाईल असेही राठोड यांनी सांगितले. या औद्योगिक, श्रमिकनगरी मधील हक्कांच्या घराच्या सर्व योजनांमधील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्यास वचनबद्ध आहोत. केंद्र सरकारच्या विविध घरकुल योजना प्रलंबित ठेवण्यात येथील लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन व नागरी प्रकल्पातील भ्रष्ट कारभारामुळे स्मार्ट सिटीच्या विकास अपूर्ण राहिला आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध राहणार आहोत.प्रस्थापित राजकीय पक्षाबरोबर आम्ही युती करणार नाही, असेही त्यांनी सांगितले