टँकरने पाणी घेणाऱ्या सोसायट्यांना पाणीपट्टी माफ करा – डॉ. कैलास कदम

0
184

शहराच्या सर्व भागांचे वॉटर ऑडिट करा

कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा

पिंपरी, दि. ८ ऑगस्ट (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा पवना आणि आंद्रा धरणातून करण्यात येतो. मागील तीन वर्षांपासून ही धरणे पूर्ण क्षमतेने भरून सुध्दा शहरास दिवसाआड पाणी पुरवठा मिळत आहे. या पावसाळ्यात हे दोन्हीही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर अतिरिक्त पाण्याचा धरणातून विसर्ग करण्यात आला. अद्यापही शहरातील नागरिकांना पूर्ण क्षमतेने दररोज पाणीपुरवठा करण्यास मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. अनेक सोसायट्यांना टँकरद्वारे पाणी घ्यावे लागते हे सर्व नागरिक मनपाची पाणीपट्टी भरतात व टँकरचे देखील पैसे भरतात ही नागरिकांची मनपा आणि टँकर लॉबी कडून लूट सुरू आहे. यासाठी मनपाचे भ्रष्ट आणि कामचुकार अधिकारी जबाबदार आहेत अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी व शहर टँकर मुक्त करावा तसेच आजपर्यंत नागरिकांनी भरलेले टँकरच्या पाण्याचे पैसे या अधिकाऱ्यांच्या पगारातून कपात करून नागरिकांना द्यावेत.

अधिकारी व टँकर चालकांची अभद्र युती आयुक्तांनी मोडून काढून नागरिकांना न्याय द्यावा. तसेच ज्या सोसायट्यांनी टँकरने पाणी घेतले आहे अशा सोसायट्यांची पाणीपट्टी पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली आहे अन्यथा शहर काँग्रेसच्या वतीने १५ ऑगस्ट नंतर मनपा भवनावर भव्य मोर्चा काढून आयुक्त व मनपा अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी दिला आहे.