टँकरच्या धडकेत मृत्युच्या एकाच दिवशी दोन घटना

0
123

दि ७ जुलै (पीसीबी ) सांगवी,
टँकरखाली चिरडून मृत्यू झाल्याच्या दोन घटना शुक्रवारी (दि. 5) घडल्या. पहिली घटना हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात घडली तर दुसरी घटना पिंपळे गुरव मधील म्हसोबा चौकात घडली. दोन्ही अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे बहिणीला घेऊन तिला कामावर सोडण्यासाठी निघालेल्या भावाच्या दुचाकीला अपघात झाला. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या पाण्याच्या टँकरचे चाक भावाच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन भावाचा बहिणीच्या डोळ्यादेखत मृत्यू झाला.

करण कालिदास जाधव (वय 23, रा. हिंजवडी गावठाण) असे मृत्यू झालेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी क्रांती कालीदास जाधव (वय 21, रा. हिंजवडी गावठाण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका दुचाकी चालक आणि एका टँकर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसोबा चौक, पिंपळे गुरव येथे भरधाव टँकरने एका दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील एक तरुण टँकरखाली आला. टँकरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सहप्रवासी जखमी झाला.

विनोद गुणाजी नरवडे (वय 30, रा. नांदेड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राम गुणाजी नरवडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. टँकर चालक सागर अशोक निघुते (वय 32, रा. अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.