झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने केली सेवा कराची विक्रमी वसुली!

0
2

पिंपरी,दि.१२(पीसीबी)- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत शहरात महिलांना केंद्रस्थानी ठेवून एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ‘सारथी सोनचीरैया’ शहर उपजीविका केंद्राशी संलग्न व पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत झोपडपट्टीवासियांना सेवाकर बिलांचे वितरण आणि मोबाईल ॲपद्वारे माहिती संकलित केली जात आहे. या उपक्रमांतर्गत मार्च २०२५ पासून सेवाकर बिलांचे वितरण सुरू झाले असून तेव्हापासून आतापर्यंत झोपडपट्टीवासियांनी चांगला प्रतिसाद देत जवळपास ७६ लाख ८३ हजार ३९७ रुपयांचा विक्रमी सेवाकर जमा केला आहे.

झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासोबतच त्यांच्या कुटुंबांना आर्थिक बळकटी मिळत आहे. आज या महिला सेवाकर बिलांचे वितरण करण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल ॲपच्या सहाय्याने माहिती देखील संकलित करीत आहेत. या उपक्रमामुळे झोपडपट्टी भागातील महिलांना रोजगार मिळाल्याने त्यांचा समाजातील दर्जा उंचावत असून त्यांच्या योगदानामुळे कुटुंब व समाजाच्या आर्थिक-सामाजिक उन्नतीत भर पडत आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ महसुलवाढीपुरता मर्यादित नसून महिलांच्या सबलीकरणाचे प्रतीक ठरला आहे.

वेळेवर मिळत आहे सेवाशुल्काचे बिल

झोपडपट्टीवासियांना यापूर्वी अपुरे पत्ते, चुकीचा मोबाईल क्रमांक अशा समस्यांमुळे सेवा शुल्क बिल वेळेत मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. मात्र आता या उपक्रमामुळे सेवा शुल्क बिल वेळेत मिळत असून झोपडपट्टीवासी स्वतःहून सेवा शुल्क भरण्यास पुढे येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना वाढीस लागली आहे आणि महापालिकेच्या महसुलामध्येही वाढ होत आहे. हा उपक्रम सुरू झाल्यापासून म्हणजेच १७ मार्च २०२५ पासून आजपर्यंत सुमारे ७६ लाख ८३ हजार ३९७ रुपयांची वसुली झाली आहे. महसुलातील ही वाढ थेट शहराच्या विकासासाठी हातभार लावणारी ठरत आहे.


गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत विक्रमी वसुली

झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाकडे सेवाकराच्या माध्यमातून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३९ लाख ८ हजार २१ रुपये व आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये २९ लाख ७७ हजार ६६८ रुपये महसूल जमा झाला होता. मार्च २०२५ मध्ये महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत झोपडपट्टीवासियांना सेवाकर बिलांचे वितरण सुरू झाले. त्यानंतर वेळेत बिल मिळाल्याने १७ मार्च २०२५ ते ३१ मार्च २०२५ याकाळात जवळपास १९ लाख ३ हजार ४२९ रुपयांचा सेवाकर वसूल झाल्याने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये सेवाकराच्या माध्यमातून जमा होणाऱ्या महसुलात मोठी वाढ झाली. आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये वसूल झालेला सेवाकर ४५ लाख ५४ हजार ७०७ रुपये आहे. तर, १ एप्रिल २०२५ पासून म्हणजेच आर्थिक वर्ष २०२५-२६ सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ५७ लाख ७९ हजार ६७० रुपये महसूल जमा झाला आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सेवाकर वसुलीची ही आकडेवारी विक्रमी आहे.


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ‘सारथी सोनचीरैया’ शहर उपजीविका केंद्राशी संलग्न महिला बचत गटांच्या प्रतिनिधींमार्फत झोपडपट्टीवासियांना सेवाकर बिलांचे वितरण करण्यात येत आहे. महिलांना केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महसुलवाढीसह महिलांचे सबलीकरण घडत आहे. तसेच सेवाकर वेळेवर भरून झोपडपट्टीवासियांचे देखील या उपक्रमाला चांगले सहकार्य मिळत आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका