झुंडशाहीच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थाच मोडून काढण्याचा प्रयत्न

0
311

तळेगाव दाभाडे, दि. ५ (पीसीबी) – झुंडशाहीच्या माध्यमातून लोकशाही व्यवस्थाच मोडून काढण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला उद्देशून केली. विकासाचे दावे फोल ठरल्याने भावनेला हात घालून, जातीय तेढ निर्माण करून लोकांच्या मनात विष कालवण्याचे काम केले जात आहे, असेही ते म्हणाले. तळेगाव नगरपरिषद इमारतीचे भूमीपूजन पवारांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार सुनील शेळके, रोहित पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह कृष्णराव भेगडे, मदन बाफना, माउली दाभाडे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, देशाच्या एकतेला, अखंडतेला धोका निर्माण होण्यासारखी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर आकाशाला भिडले आहेत. जीवनाश्यक वस्तू महागल्या आहेत. श्रीलंकेत लोकप्रतिनिधींची घरे, मोटारी जाळण्यात आल्या. पाकिस्तानात बॉम्बस्फोट, जातीय दंगे घडत आहेत. आपल्या शेजारी राष्ट्रातील हे वातावरण भारताला परवडणारे नाही. आपल्याकडेही भोंगे, हनुमान चालीसा, मारुतीरायाचे जन्मस्थान असे प्रश्न उपस्थित करून वातावरण पेटवण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारच्या मुद्यांमुळे बेकारी, महागाईचे प्रश्न सुटणार आहेत की जातीय दंगे थांबणार आहेत, याचा विचार झाला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या जाती, धर्माचा अभिमान जरूर बाळगावा. मात्र, दुसऱ्याला त्रास होईल, असे काही करू नये. कोणताही धर्म चुकीचे वागा, असे सांगत नाही. सर्व जाती, धर्मातील मावळे एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून कल्याणकारी राज्य केले, हा इतिहास आहे. नेमका तोच विसरून नको त्या गोष्टी केल्या जात आहेत. लोकशाही, राज्यघटना टिकवण्याचे सर्वांपुढे आव्हान आहे. देशाच्या एकतेला धक्का बसता कामा नये. विकासाचे विषय जनतेसमोर मांडावेत. मात्र, नको त्या मुद्द्यांच्या मागे फरफटत जाण्याचे काहीच कारण नाही, असे पवार म्हणाले.

‘आम्ही शिव्या सुरू केल्यास पळून जावे लागेल’
जगात आमचा पक्ष मोठा आहे, असे भाजपवाले एकीकडे सांगतात आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष महिलांबद्दल पुण्यात अपशब्द वापरतात. आम्ही ग्रामीण भागातून आलो आहेत. आम्हालाही बरेच काही बोलता येते. ‘भ’ ची भाषा आम्ही सुरू केली तर पळून जाण्याची वेळ येईल. पण आम्ही त्या स्तरावर जाणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

‘मंत्री असला तरी निधी आणायला अक्कल लागते’
मावळात कित्येक वर्षे राष्ट्रवादीचा आमदार निवडून येत नव्हता, याची खंत होती. मात्र, सुनील शेळकेंच्या माध्यमातून सगळा अनुशेष भरून निघाला. आघाड्याऐवजी सर्व स्थानिक निवडणुका यापुढे घड्याळाच्या चिन्हावर लढवाव्यात. तळेगाव, वडगाव, लोणावळा यासह जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या १२ जागा निवडून द्या. मग महत्त्वाची पदे मावळात देऊ, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली. तुमचा यापूर्वीचा आमदार राज्यमंत्री होता. तरीही तालुक्यासाठी निधी आणता आला नाही. निधी आणण्यासाठी अक्कल असावी लागते. पाठपुरावा करावा लागतो. ते त्यांना जमले नाही, असे अजित पवार म्हणाले.