रांची, दि. २२ (पीसीबी) – झारखंडमध्ये महिलांबाबत गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. शुक्रवारी चाईबासा विमानतळाला भेट देण्यासाठी आलेल्या एका तरुणीचं तिच्या मित्रासोबत दहा तरुणांनी अपहरण केलं. मित्रानं तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधमांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी मुलीला एका निर्जनस्थळी नेलं आणि तिथं तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी सांगितलं की, पीडित तरुणी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. सामूहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली. पळून जात असताना आरोपींनी तिच्याकडील मोबाईल फोन आणि पैसेही काढून घेतले. याबाबत रुग्णालयात दाखल पीडितेनं पोलिसांना जबाब दिला आहे.
तिच्या जबाबाच्या आधारे चाईबासा पोलिसांनी दहा अज्ञात तरुणांविरुद्ध सामूहिक बलात्कार, प्राणघातक हल्ला आणि दरोडा या कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथकं तयार केली आहेत. ही पथकं आरोपींच्या संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकत आहेत.
झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील चाईबासा येथील रहिवासी असलेल्या पीडित तरुणीनं पोलिसांना दिलेल्या जबाबात संपूर्ण हकीकत सांगितली. ती म्हणाली, मी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. शुक्रवारी मी चाईबासा विमानतळाला भेट देण्यासाठी माझ्या मित्रासोबत स्कूटीवरुन गेली होती. दोघंही तिथंच बोलत बसलो होतो. त्याचवेळी दहा तरुण तिथं आले आणि त्यांनी माझ्याशी गैरवर्तन सुरु केलं. माझ्या मित्रानं मला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्याला बेदम मारहाण करून पळवून लावलं. त्यानंतर मला निर्जनस्थळी नेऊन सर्व लोकांनी माझ्यावर बलात्कार केला, असं पीडित तरुणीनं जबाबात नमूद केलंय. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीनंतर मुफसिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.