ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, ३० हजार प्रत्येकी मिळणार

0
79

मुंबई, दि. ९ ऑगस्ट (पीसीबी) – येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठमोठ्या घोषणा करण्यात येत आहेत. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना खूश करण्यासाठी एका नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली जाणार आहे. या योजनेद्वारे प्रतिव्यक्ती 30 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी योजनांची घोषणा होत आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेतंर्गत महिलांना १५०० दर महिना दिले जाणार आहेत. तर तरुणांसाठी लाडका भाऊ ही योजना सुरु केली आहे. त्याद्वारे बारावी पास तरुणांना दरमहा ६ हजार रुपये, आयटीआय आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्युत्तर तरुणांना १० हजार रुपये मिळणार आहे.

यानतंर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष योजना आणली जाणार आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेद्वारे ज्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा आहे, पण काही कारणांनी त्यांना ही इच्छा पूर्ण करता आलेली नाही, त्या ज्येष्ठ नागरिकांची इच्छा आता शासन पूर्ण करणार आहे. राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतके अनुदान प्रवास खर्चासाठी देण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश असणार आहे. या योजनेंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती 30 हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इ. सर्व बाबींचा समावेश असेल. या योजेनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.