ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांना गझलपुष्प जीवनगौरव पुरस्कार जाहीर

0
471

पिंपरी (दिनांक : १८ जुलै २०२३) मराठी साहित्यातील गझल या काव्यप्रकारात गेली पन्नास वर्षे सातत्याने लेखन, सादरीकरण आणि गझल प्रचार…प्रसार करत असलेले तसेच ज्यांना गझलसम्राट सुरेश भट यांचा निकटचा सहवास लाभला असे ज्येष्ठ गझलकार म.भा. चव्हाण यांना ‘गझलपुष्प’ ह्या गेली पाच वर्षे पिंपरी – चिंचवडमध्ये मराठी गझलेच्या प्रचार व प्रसारासाठी सातत्याने यशस्वीपणे प्रयत्न करत असलेल्या संस्थेतर्फे ‘स्व. सुदामदादा कराळे जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

म. भा. चव्हाण हे गझल विश्वातील ज्येष्ठ आणि आदरणीय असे व्यक्तिमत्त्व असून १९७२ पासून कवितालेखन व १९८२ पासून गझललेखन करत आहेत. विविध नियतकालिके, वृत्तपत्रे, दिवाळी अंक, काव्यसंग्रह आणि गझलसंग्रह यांतून सातत्याने त्यांचे गझललेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांची ‘असेलही नसेलही’ ही गझल गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी स्वरबद्ध केली असून ती सातत्याने विविध कार्यक्रमांत सादर केली जाते. हा पुरस्कार गझलपुष्प संस्थेच्या मासिक सभेमध्ये गझलपुष्पचे संस्थापक – अध्यक्ष दिनेश भोसले, विद्यमान अध्यक्ष संदीप जाधव, कार्याध्यक्ष प्रशांत पोरे, कोषाध्यक्ष अभिजित काळे, ज्येष्ठ सल्लागार नंदकुमार मुरडे, सुहास घुमरे, सरोज चौधरी, नीलेश शेंबेकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत सर्वानुमते जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार २२ जुलै २०२३ रोजी कॅप्टन कदम सभागृह, निगडी येथे सायंकाळी ४:३० वाजता सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच या पुरस्कार सोहळ्यानंतर बहारदार मराठी गझल मुशायरा आयोजित करण्यात आला आहे याचाही रसिकांनी लाभ घ्यावा.

यापुढे दरवर्षी १५ एप्रिल रोजी गझलसम्राट सुरेश भट साहेबांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे कार्यकारिणी सभेमध्ये ठरविण्यात आले आहे.

  • प्रदीप गांधलीकर
    ९४२१३०८२०१
    ७४९८१८९६८२