ज्येष्ठ कवी, गीतकार ना. धों. महानोर यांचं निधन…

0
275

पुणे,दि.०३(पीसीबी) – ज्येष्ठ कवी, गीतकार ना. धों. महानोर यांचं निधन झालंय. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध यायचा. त्यांच्या गीतांमधून-कवितांमधून निसर्गाचं खऱ्या अर्थाने दर्शन घडायचं. त्यांनी जशी निसर्गाची वर्णन करणारी गीतं लिहिली, तशा ठससेबाज लावण्याही लिहिल्या. श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ ही लावणी लोकप्रिय झाली. आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे.

आम्ही ठाकर ठाकर, चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं, जांबुळ पिकल्या झाडाखाली, जाई जुईचा गंध, किती जीवाला राखायचं, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती अशी एकाहून एक सर गाणी ना.धों. महानोर यांनी लिहिली.

महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे. त्यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘पळसखेडची गाणी’ म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना. केवळ निसर्गकविता न लिहिता, आपल्या काव्यलेखनाला त्यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. त्यातून आपल्या गावी पळसखेड्याला शेतीचे विविध प्रयोगही केले. त्यामुळेच सरकार कुठलंही असो, त्यांचं लक्ष कृषिधोरणाकडे असायचं.

पंचेचाळीस वर्षांपूर्वी हजार लोकसंख्या असलेलं पळसखेडे हे गाव महानोरांच्या कवितांमुळे जगाच्या नकाशावर आलं आहे. या गावाची माती आणि शेती त्यांना चिकटली ती कायमची. तिचा त्यांनी कायम अभिमान बाळगला. ते कुठेही गेले तरी पळसखेड हे त्यांचं आनंदनिधान ठरलं आहे. तिथे त्यांनी महात्मा फुले यांच्या नावाने वाचनालय सुरू केलं असून तेथील सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचं ते प्रमुख केंद्र ठरलं आहे.