ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन

0
5

दि.०७(पीसीबी)-दिग्गज गायिका व ज्येष्ठ अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन झालं आहे. १९७० च्या दशकात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सुलक्षणा या ७१ वर्षांच्या होत्या. सुलक्षणा पंडित यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.सुलक्षणा या संगीतकार जतिन-ललित आणि अभिनेत्री विजयता पंडित यांची बहीण होत्या. सुलक्षणा मागील काही काळापासून आजारी होत्या. ललित पंडित यांनी बहिणीच्या निधनाची पुष्टी केली आहे. सुलक्षणा यांचे गुरुवारी रात्री ८ वाजता वाजता नानावटी रुग्णालयात निधन झाले. “तिला हृदयविकाराचा झटका आला. शुक्रवारी, ७ नोव्हेंबर रोजी दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जातील,” अशी माहिती ललित पंडित यांनी दिली.

सुलक्षणा पंडित यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. चाहते त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहत आहेत. सुलक्षणा यांनी ७० च्या दशकात करिअरला सुरुवात केली होती. उत्तम गायिका असलेल्या सुलक्षणा अभिनयक्षेत्रात आल्या आणि अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या होत्या.


सुलक्षणा पंडित यांचं चित्रपटांमधील करिअर
सुलक्षणा पंडित यांनी १९७५ मध्ये ‘उलझन’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या सिनेमात संजीव कुमार मुख्य भमिकेत होते. ‘संकोच’, ​​’हेरा फेरी’, ‘अपनपन’, ‘खानदान’, ‘चेहरे पे चेहरा’, ‘धरम कांटा’ आणि ‘वक्त की दीवार’ हे सुलक्षणा पंडित यांचे गाजलेले चित्रपट होय.


पंडित यांचं संगीतातील करिअर
सुलक्षणा पंडित यांनी अनेक गाण्यांना आपला सुमधुर आवाज दिला होता. १९६७ मध्ये ‘तकदीर’ चित्रपटातील ‘सात समुंदर पार से’ हे गाणं लता मंगेशकर यांच्याबरोबर गायलं होतं. त्यांनी हेमंत कुमार, किशोर कुमार यांच्याबरोबर गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांनी हिंदी, बंगाली, मराठी, उडिया आणि गुजराती गाणी गायली होती. १९८६ साली त्यांनी लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण केलं होतं.


सुलक्षणा पंडित यांनी करिअरमध्ये संगीत क्षेत्रातील दिग्गज लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार, शैलेंदर सिंग, येसुदास, महेंद्र कपूर आणि उदित नारायण यांच्याबरोबर गाणी गायली. तसेच शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी, कानू रॉय, बप्पी लाहिरी, उषा खन्ना, राजेश रोशन, खय्याम आणि राजकमल या संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केलं होतं. ‘खामोशी द म्युझिकल’ (१९९६) मधील ‘सागर किनारे भी दो दिल’ या गाण्यासाठी त्यांनी शेवटचा आलाप रेकॉर्ड केला होता. हे गाणं सुलक्षणा यांचे भाऊ जतिन आणि ललित यांनी संगीतबद्ध केलं होतं.