ज्यांना कुणबी शब्दाची लाज वाटते त्यांनी शेती विकून चंद्रावर जावे

0
247

वाई, दि. १८ (पीसीबी) : मराठा समाजातील काही जणांना कुणबी दाखला नको असे मत आहे. आपल्याला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, मग कुणबी का नको. ज्यांना कुणबी शब्दाची लाज वाटते त्यांनी शेती विकून चंद्रावर जावे, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात दिला. सातारा येथे गांधी मैदानावर आज शनिवारी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणासाठी सभा झाली. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. मराठा समाजातील काहींना कुणबी म्हणून घेण्यास लाज वाटते त्यांनाही फटकारले.

मराठा आरक्षणावरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावण्याचे काम राजकारण्यांकडून सुरु आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे आणि ते ओबीसी मधूनच मिळणार आहे. फक्त मराठा समाजाने थोडा संयम ठेवावा. आपण एकत्र आलो आहोत. आपली भाषा सरकारला चांगली कलती आहे. मराठ्यांना आरक्षण सरकारला द्यावेच लागेल. नाही दिलं तर काय होतं ते त्यांनी आंदोलनातून बघितलं आहे, असं सांगून जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

शेती करणे म्हणजे कुणबी होय. ज्याला कुणबी शब्दाची लाज वाटते त्याने शेती विकून चंद्रावर जावे. आरक्षण पाहिजे मग त्यात लाज वाटण्यासारखं काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मी प्रांतीय भेदभाव करत नाही. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असा भेद करणार नाही. २४ डिसेंबरला सरसकट आरक्षण देण्याचे शासनाने आश्वासन दिले म्हणून उपोषण मागे घेतले. पण आता मराठा समाजाने सावध राहावे. माझा जीव गेला तरी मी आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच गावागावांत साखळी उपोषण सुरु करण्याचा सल्ला दिला.

आपल्याला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आहे. मग कुणबी म्हणून घ्यायला लाज वाटायचे कारण नाही. शेती करणे म्हणजे कुणबी. ज्याला कुणबी शब्दाची लाज वाटते त्याने शेती विकून चंद्रावर जावे, असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यातील सभेत दिला. सभेला सातारा पंचक्रोशीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.