दि.२४(पीसीबी)-अमेरिका आणि इराण यांच्यात नेमकं पडद्यामागे काय सुरू आहे, याबाबत सध्या जागतिक स्तरावर सस्पेन्स कायम आहे. एकीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत चर्चा सुरू असल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे इराणने अशा कोणत्याही चर्चांना स्पष्टपणे नकार दिला आहे.या परस्परविरोधी दाव्यांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेच्या एका गुप्त रणनीतीचा खुलासा झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. अमेरिकी मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणमधील प्रभावशाली आणि कट्टरपंथीय नेता मोहम्मद बागेर गालिबफ यांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून सुरू आहे.
सध्या इराणी संसदचे स्पीकर असलेले गालिबफ हे देशातील प्रभावी नेत्यांपैकी एक मानले जातात. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्डमध्ये त्यांनी कारकीर्द सुरू केली होती आणि पुढे जनरल पदापर्यंत मजल मारली. त्यानंतर ते तेहरानचे महापौरही राहिले आहेत. राजकीय आणि लष्करी दोन्ही पातळ्यांवर मजबूत पकड असलेले गालिबफ, इराणच्या सत्ताकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मानले जाते.
अमेरिकी सूत्रांच्या हवाल्याने काही माध्यमांनी दावा केला आहे की, गालिबफ यांच्या माध्यमातून इराणमध्ये आपले हित साधण्याचा प्रयत्न ट्रम्प प्रशासन करत आहे. इतकेच नव्हे, तर चर्चेसाठी उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनाही पाठवण्याची तयारी दर्शवली गेल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, गालिबफ यांना भविष्यातील संभाव्य ‘सुप्रीम लीडर’ म्हणूनही पाहिले जात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या सर्व दाव्यांवर गालिबफ यांनी स्वतः सोशल मीडियावर येत प्रतिक्रिया दिली असून, अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
या घडामोडींमुळे होर्मुज सामुद्रधुनीवरील नियंत्रण, मध्यपूर्वेतील सत्ता समीकरणे आणि जागतिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सध्या या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत स्तरावर स्पष्टता नसली, तरी अमेरिका-इराण संबंधांमधील पडद्यामागील हालचालींमुळे जागतिक राजकारणात नव्या घडामोडींची चाहूल लागली आहे.







































