‘ज्ञानप्रबोधिनी’च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात, भावपूर्ण वातावरणात दिला बाप्पाला निरोप

0
323

पिंपरी दि. ९ (पीसीबी) – विविध राज्यातील वेशभूषा परिधान करुन शिस्तबद्धपणे केलेले नृत्याचे सादरीकरण…तबला, लयबद्ध ढोल वादन…लेझीम, दांडिया….क्रांतिकारकांची माहिती हातात घेतलेले फलक….चित्तथरारक मल्लाखांबाच्या प्रात्यक्षिकाचे सादरीकरण…. टाळ मृदगांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयजयकार…उत्साह आणि भावपूर्ण वातावरण निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवगर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लाडक्या बाप्पाला आज (शुक्रवारी) निरोप दिला. नियोजनबद्ध झालेली मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

ज्ञानप्रबोधिनी नवगर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केली. दहा दिवसानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला. माजी नगरसेवक अमित राजेंद्र गावडे यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती झाली. त्यानंतर विसर्जन मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. या मिरवणुकीत माजी महापौर आर.एस. कुमार, युवा नेते अनुप मोरे, ज्ञानप्रबोधिनी शाळेचे केंद्रप्रमुख, प्राचार्य मनोज देवळेकर, पर्यवेक्षक सुधीर कुलकर्णी, व्यवस्थापक आदित्य शिंदे, प्रशासन प्रमुख शिवराज पिंपुडे, गणेशोत्सव प्रमुख प्रमोद सादूल यांच्यासह विद्यार्थी, पालक, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

इॅस्कॉनच्या सुंदर अशा भक्ती-रथात बाप्पा विराजमान झाले होते. या मिरवणुकीत 35 गट होते. अभंग, ओव्या, टाळ, मृदुंगाबरोबरच पालकांनी प्रबोधिनीतील कार्यकर्त्यांनी रचलेली पद्ये गायली. पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे विद्यार्थ्यी, नचिकेत बालग्रामच्या 40 विद्यार्थ्यांच्या गटाने आपली कला सादर केली. काश्मिर, दक्षिण भारत, गुजरात, महाराष्ट्र, पूर्व भारतातील सात राज्ये, पंजाब, पश्चिम बंगाल या प्रांतातील पोशाखाची वेशभूषा केली होती. त्या भागातील पद्य, अभंग, भजन, घोषणांचे सादरीकरण केले. याशिवाय पंजाबी, आसामी, राजस्थानी, गुजराती, गोवा या पाच राज्यातील कला, नृत्य प्रकाराचेही उत्तम पद्धतीने सादरीकरण झाले. क्रीडा कुलच्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. शिशु गटातील विद्यार्थ्यांनी भारतातील आदर्श थोर पुरुषांची वेशभूषा केली होती.

क्रांतिकारकांच्या वेषभूशेतील विद्यार्थी, पालक आणि आठवी ते दहावीचे विद्यार्थ्यांचे ‘बर्चि’ नृत्य पाहून उपस्थितांचे डोळे दिपून गेले. अभंग, ओव्या, टाळ-मृदंगाचा गजर अशा मोठा उत्साहात आणि जल्लोषात बाप्पाला निरोप देण्यात आला. सुमारे 2000 जणांचा सहभाग – 7 ते 10 वी विद्यार्थी , पालक, शिक्षकांचा सहभाग . मिरवणुकीची लांबी 1 किमी. सूत्र – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विशेष – 4 बरची पथके, 5 राज्यांचे नृत्य प्रकार, 10 राज्यांच्या वेशभूषेत पालक-विद्यार्थी , देशाच्या गेल्या 75 वर्षांच्या अभिमानास्पद कार्याचा उल्लेख करणारे, देशाचा सन्मान वाढविणाऱ्या व्यक्तींची माहिती देणारे तक्ते, पुरुष पालकांची भजनी दिंडी, महिला पालकांचे बरची पथक, पद्य म्हणणारे पालक-अध्यापकांचे गट, परिसरातील 2 शाळांचे विद्यार्थी, इस्कॉनचा भजनी गट ही मिरवणुकीतील प्रमुख वैशिष्ट्ये होती.

सकाळी 9 वाजता वाजता सुरु झालेली मिरवणूक दुपारी 12 वाजता संपली. विशाल कॉर्नर, गायत्री हॉटेल, काचघर चौक, उद्घोष तरुण मंडळ मार्गे मिरवणूक निघाली. शाळेजवळील मातृमंदिर पथ येथे बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. ज्ञानप्रबोधिनीची शिस्तबद्ध विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.