ज्ञानप्रबोधिनीची गणेश विसर्जन मिरवणूक असणार ‘अविस्मरणीय’

0
327

पाच प्रदेशातील नृत्य, प्रांतवार वेशभूषा, क्रांतिकारकांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, ‘बर्ची’ नृत्य अन् बरेच काही…

पिंपरी दि. ८ (पीसीबी) – कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी यंदांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा होत असून दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आता उद्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरु आहे. निगडीतील ज्ञानप्रबोधिनी शाळेतील गणपती विसर्जन मिरवणुकीत विविध कला सादर केल्या जाणार आहेत. पाच प्रदेशातील नृत्य, प्रांतवार वेशभूषा, तेथील कलेचे सादरीकरण, क्रांतिकारकांच्या वेशभूषेतील विद्यार्थी, ‘बर्ची’ नृत्य, अभंग, ओव्या सादर केल्या जाणार आहेत. इॅस्कॉनच्या भक्ती-रथात बाप्पा विराजमान होणार असून या मिरवणुकीत परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ज्ञानप्रबोधिनी शाळेचे केंद्रप्रमुख मनोज देवळेकर यांनी केले आहे .

गणेश उत्सव हा ज्ञान – कला – मनोरंजन यांचा अभिजात संगम आहे. या माध्यमातून प्रत्येकाला आपली कला सादर करण्याची व त्यातून स्व-शोधनाची उर्मी जागृत होत असते. कोरोना काळानंतर दोन वर्षांनी प्रथमच गणेशोत्सव साजरा होत आहे. यंदाचे वर्ष हे देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्यामध्ये विद्यालयाचाही खारीचा वाटा असावा या जाणिवेतून काही उपक्रमांची मांडणी केली. गणरायाच्या सभामंडपात ही गणेश मूर्तीच्या पाठीमागे लाल किल्ल्याचा देखावा मांडून एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक विचारांचा समन्वय प्रदर्शित केला. त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर काळातील देशाचा विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेणाऱ्या काही अभ्यास विषयांच्या तक्त्यांचेही प्रदर्शन सभा मंडपात मांडले होते.

उत्सवातील पूर्ण दहा दिवस वेगवेगळ्या विभागांमध्ये विद्यार्थ्यांच्या वयोगटांनुसार मनोरंजक आणि बौद्धिक आनंद देणारे उपक्रम घेतले. निगडी केंद्रातील विद्यार्थी – पालक – शिक्षक आणि माजी विद्यार्थी मिळून भारताच्या 75 वर्षांच्या वाटचालीचा विविध गटांमध्ये काही महिन्यांपासून अभ्यास करीत आहेत. त्यांनी केलेल्या अभ्यासाचा पहिला टप्पा म्हणून छोट्या स्वरूपात त्याचे सादरीकरण व्हावे यासाठी रोज होणाऱ्या दोन्ही वेळच्या महाआरतीच्या वेळी प्रत्येक गटातील गट सदस्य आपल्या विषयाची मांडणी करतात.

प्राधिकरण, चिंचवड या परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये माध्यमिक गटाचे विद्यार्थ्यांनी जाऊन ‘बर्ची’ नृत्य, अथर्वशीर्ष पठण आणि स्वतः केलेल्या अभ्यासाची मांडणी केली. तर, प्राथमिकच्या गटातील विद्यार्थी हे प्राधिकरणातील विविध मंदिरे आणि गणेश मंडळांमध्ये जाऊन अथर्वशीर्षाचे पठण केले. यामागील उद्देश एवढाच की सोसायट्यांमधील, मंडळांमधील नागरिक, कार्यकर्ते आमच्या उत्सवात सहभागी व्हावेत. त्यांचा सहभाग वाढावा आणि हा उत्सव फक्त विद्यालयापुरता मर्यादित न राहता त्याला सार्वजनिक रूप यावे. कृषीरत्न चंद्रशेखर भडसावळे यांचे ‘स्वातंत्र्योत्तर भारताच्या कृषी क्षेत्रातील गत 75 वर्षांचा लेखा-जेाखा’, ज्ञान प्रबोधिनीचे कार्यवाह सुभाषराव देशपांडे यांचे ‘भारताच्या जडणघडणीत सामाजिक संघटनांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान झाले. तर, चाणक्य मंडळाचे संचालक अविनाश धर्माधिकारी यांचे ‘भारताच्या जडणघडणीत विविध धोरणांचे योगदान’ या विषयावर आज सायंकाळी व्याख्यान होणार आहे.

बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर विसर्जनाची वेळ आली आहे. बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यासाठी विद्यार्थ्यांनी जय्यत तयारी केली आहे. ज्ञानप्रबोधिनीची बाप्पाची मिरवणूक उद्या (शुक्रवारी) सकाळी 7 ते 12 या वेळेत होणार आहे. सकाळी साडेआठ वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. विशाल कॉर्नर, गायत्री हॉटेल, काचघर चौक, उदघोष तरुण मंडळ मार्गे रावेत येथे विसर्जन ठिकाणी मिरवणूक पोहचेल. या मिरवणुकीत 35 गट असणार आहेत. पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या विद्यार्थ्यांचाही एक गट आपली कला सादर करणार आहे. नचिकेत बालग्रामचा 40 विद्यार्थ्यांचाही एक गट असणार आहे.

क्रांतिकारकांच्या वेषभूशेतील काही विद्यार्थी गटामध्ये असणार आहेत. पालक आणि 8, 9, 10 वीचे विद्यार्थीही ‘बर्चि’ नृत्य सादर करणार आहेत. 8 वीचा गट नृत्य करणार आहेत. वेगवेगळे गट काश्मिर, दक्षिण भारत, गुजरात, महाराष्ट्र, पूर्व भारतातील सात राज्ये, पंजाब, पश्चिम बंगाल या प्रांतातील पोशाखाची वेशभूषा करणार आहेत. त्या भागातील पद्य, अभंग, भजन, घोषणांचे सादरीकरण केले जाणार आहे. याशिवाय पंजाबी, आसामी, राजस्थानी, गुजराती, गोवा या पाच राज्यातील कला, नृत्यप्रकार सादर होणार आहेत. क्रीडा कुलच्या विद्यार्थ्यांचे मल्लखांबाच्या प्रातक्षिकाचे सादरीकरण होणार आहे. काही पालके अभंग, ओव्या म्हणणार असून काही गट घोषणा देत जाणार आहेत. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन देवळेकर यांनी केले.