जोमाने कामाला लागा, शिरुरचा लवकरच दौरा! शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

0
234

मुंबई  दि. ५ (पीसीबी)- आपल्यावरील कारवाई नजरचुकीने झाली आहे. पक्षासाठी व मतदारसंघासाठी आपण प्रामाणिकपणे काम केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जोमाने कामाला लागावे. शिरूर मतदारसंघात मी लवकरच दौरा करणार आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना सांगितले.

आढळराव पाटील व जिल्हाप्रमुख शरद सोनवणे यांनी आज ‘मातोश्री’ येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आढळराव पाटील यांचे म्हणणे ऐकून घेतले. शिवसेनेचे काम आपण प्रामाणिकपणे केले आहे. विशेषतः कोरोना काळात आपल्या कामाची दखल राज्य पातळीवर घेण्यात आली. ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या वेळीही आपण मदतीला धावून गेलात. त्यामुळे पुन्हा जोमाने काम करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रयत्न करून जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार निवडून आणा. शिरूर मतदारसंघात लवकरच दौरा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, खासदार संजय राऊत, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, आदेश बांदेकर आदी उपस्थित होते.