जे लोकसभेत झाले ते विसरुन विधानसभेमध्ये महायुतीचे सरकार आणण्यासाठी आशिर्वाद द्या…

0
84

जागोजागी अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांचे महिला – भगिनींनी राख्या बांधून केले उत्स्फूर्त स्वागत…

दिंडोरी दि. ८ ऑगस्ट (पीसीबी) – माझ्यासारख्या एका जनसेवकासाठी जनता हीच देव आहे. आणि तुम्ही दिलेली शक्ती हीच माझी दैवीशक्ती आहे. तीन दशकापासून ठामपणे तुम्ही माझ्या पाठीशी ती उभी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन जसे स्वराज्य उभे केले त्या सर्व घटकांचा आवाज ऐकून, त्यांचे दु:ख.. त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत. महिला, युवा – युवती, शेतकरी यांच्यासाठी अनेक चांगल्या योजना महायुतीच्या माध्यमातून आणल्या आहेत. जनतेची सेवा करणे हा आमचा धर्म आहे. आम्ही राजे नाही तर आम्ही जनसेवक आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘जनसन्मान’ यात्रेत जनतेला आश्वासित केले.

३३ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत अनेक उन्हाळे – पावसाळे बघितले आहेत. शेतकऱ्यांना मदत केली आहे. माझ्या शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात जायला लागत होते. शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जायला लागू नये म्हणून कमी व्याजात कर्ज देण्याचा निर्णय घेतला आणि शून्य टक्के व्याजाने कर्ज द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आजही शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत आहे हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.

अजूनही महिलांचे सबलीकरण करण्याची गरज आहे. राज्याच्या महिला धोरणातून महिलांना मान – सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अजूनही अर्ज भरले जात आहेत. घाबरु नका तुम्हाला योजनेचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत हा अजितदादा तुमच्या पाठीशी उभा आहे असा शब्दही अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना दिला.

दिनांक १७ ऑगस्टपर्यंत बहिणींच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. कालच कॅबिनेट बैठकीनंतर ६ हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आज इथे आलो आहे. हा चुनावी जुमला नाही. तुम्ही साथ द्या ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे हा अजितदादाचा वादा आहे असा विश्वासही अजित पवार यांनी महिलांना दिला.

हे राज्यसरकार कुणासाठी आहे तर तुमच्यासाठी आहे… तुमच्यासाठी खर्च करायचा नाही तर कुणासाठी खर्च करायचा… असा सवाल करतानाच सर्व मुलींना मोफत शिक्षण देणार आहे. वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांचे शेतीचे वीज बील माफ केले आहे. मागचे पण आणि पुढचेही वीज बिल भरायचे नाहीय. वायरमन विचारायला आला तर त्याला माझं नाव सांगा. काळजी करु नका हे सरकार तुमच्या पाठीशी आहे असा शब्दही अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिला.

कांदा निर्यात धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येतो. त्या कांद्याने पार वांदे केले आहेत. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठवा असेही केंद्रसरकारला सांगितले आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.येणारी विधानसभा निवडणूक माझ्या माय – माऊलींची आहे. या निवडणुकीत त्यांचे काम महत्वाचे आहे. आपला मुलगा… आपला भाऊ समजून तुम्हाला पाहिजे ते सहकार्य करु… असे आश्वासनही अजित पवार यांनी यावेळी दिले.

आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही. आम्ही सत्तेत सहभागी झालो कारण त्यातून लोकोपयोगी विकासकामे करता येतात. आज मी जे काही करत आहे ते सत्तेत नसतो तर करु शकलो नसतो पण आज सत्तेत आहे म्हणून तुमच्यासाठी लाडकी बहीण योजना… शेतकऱ्यांची वीज माफी केली… मोफत तीन सिलेंडर देत आहोत… हे मी सत्तेत आहे म्हणून करु शकलो… आमची प्रशासनावर पकड असल्यामुळे आम्ही काम करु शकतो आहे हेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.सर्व जातीधर्माचे हे सरकार आहे. चांगल्या योजना तुमच्यासाठी आणल्या आहेत. आता खोट्या – नाटया गोष्टींना बळी पडू नका. जे लोकसभेत झाले ते विसरुन विधानसभेमध्ये महायुतीचे सरकार आणण्यासाठी आशिर्वाद द्या… अशी हाक अजित पवार यांनी उपस्थित लाडक्या बहिणींना घातली.

जनसन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेल्या बसने दिंडोरीकडे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे व मंत्री आणि पदाधिकारी यांचे जागोजागी महिला भगिनींनी राख्या बांधून भव्य स्वागत केले. दिंडोरी येथील सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

या जनसन्मान यात्रेचे प्रास्ताविक दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले.

या जनसन्मान यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, आमदार नितीन पवार, माजी खासदार समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदींसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.