जे लोकं खोट्याचा आधार घेऊन डरकाळ्या फोडत होते, त्यांना निकालातून कळलं असेल की सत्य कोणाबरोबर

0
175

पुणे, दि. १९ (पीसीबी) : ”काल आपल्या युतीला मोठा विजय मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खऱ्या शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. त्यामुळे त्यांचे खूप अभिनंदन. जे लोकं खोट्याचा आधार घेऊन डरकाळ्या फोडत होते, त्यांना या निकालातून कळलं असेल की सत्य कोणाबरोबर आहे”, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे गटाचे अभिनंदन केले. तर ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.

अमित शाह हे पुण्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते ‘मोदी @20’ या पुस्तकाचे मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. याबाबत शाह म्हणाले, “निवडणूक आयोगाने दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं आहे. खोट्याचा आधार घेऊन डरकाळ्या फोडणाऱ्या लोकांना या निकालातून कळलं असेल की सत्य कोणाबरोबर आहे”, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला.

“2019 च्या निवडणुकीच्या वेळी मी भाजपचा अध्यक्ष होतो. त्यावेळी बॅनरवर त्यांच्यापेक्षा मोदींचे फोटो मोठे लावले जायचे. 2019 च्या निवडणुकीच्या वेळेस संपूर्ण निवडणूक लढवताना फडणवीसांना नेता मानूनच लढवली. मात्र, मुख्यमंत्री बनण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांबरोबर जात त्यांचे तळवे चाटले”, असं म्हणत ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.

”निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. मात्र, धोका देणाऱ्यांना कधीही माफ करू नका. जर तसं केलं तर भविष्यातही तसं वागण्याचं धाडस वाढत जातं. आमचे तर सोडा त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराला आणि पक्षाला देखील धोका दिला आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नागपूर, पुणे येथे विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. तसेच पुण्यात ‘मोदी @20’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.