जे राज्यसभेवर आणि विधानपरिषदेवर निवडून येतात त्यांनी बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये – रविकांत वरपे

0
342

पुणे, दि. ६ (पीसीबी) – देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती. निर्मला सितारामन या बारामती लोकसभेच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याचबरोबर आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील बारामती लोकसभा दौऱ्यावर येणार आहेत. ते असं म्हणतात की, बारामती लोकसभेचा गड आम्ही उद्ध्वस्त करणार आहे. ज्या चंद्रशेखर बावनकुळेंना साधं विधानसभेच तिकीट मिळालं नाही, जनतेतून निवडून येऊ शकले नाही. आज त्यांना विधान परिषदेवर घ्यावं लागतं ते बारामती लोकसभा जिंकण्याची भाषा करतात, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ता रविकांत वरपे यांनी केली आहे.

ज्या निर्मला सितारामन देशाच्या अर्थमंत्री आहेत त्या २०१४ पासून राज्यसभेचं नेतृत्व करतायेत त्या निर्मला सितारामन लोकसभेच्या संसद महारत्न खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांना पराभूत करण्याची भाषा करतात. सुप्रियाताई राज्यसभेवर खासदार होत्या, पण त्यानंतर त्यांनी १५वी, १६वी, १७वी लोकसभा अशा सलग तीन लोकसभा जनतेतून निवडून आलेल्या आहेत.

वरपे म्हणतात, निर्मला सितारामन यांचं मी स्वागत करतो, की तुम्ही निश्चित बारामती लोकसभा बघायला या, तुम्हाला फार काळ राज्यसभेवर राहायचं नसेल तर सुप्रियाताई सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात जो विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, बारामती लोकसभेचं मॉडेल उभं केलेलं आहे त्याची संपूर्ण माहीती माझ्याकडे आहे. ते मी तुम्हाला दाखवेल आणि त्याचा उपयोग तुम्हाला २०२४ ला लोकसभेत निवडून येण्यासाठी निश्चित होईल. विधानपरिषदे वर आणि राज्यसभेवर नेतृत्व करणाऱ्यांनी आधी जनतेतून निवडून यावे. मग बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करावी.

लोकसभेत सुप्रियताईंचे हजेरी प्रमाण,लोकसभेतील उपस्थिती, उपस्थित प्रश्न, लोकसभेतील चर्चा सत्रात सहभाग, लोकसभेत मांडलेली खाजगी विधायके यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. तसेच राष्ट्रीय वयोश्री योजनेत सुप्रिया ताईंचे देशात क्रमांक एक चे काम आहे, २० हजार पेक्षा जास्त जेष्ठ नागरिकांना जीवन सहाय्यक उपकरणांचे मोफत वितरण केले आहे, बारामती मतदारसंघातील २५ हजार मुलींना मोफत सायकलींचे वाटप केले आहे, त्याचप्रमाणे ८ हजार कर्णबधिर मुलांना त्यांनी डिजिटल श्रवणयंत्र दिलेलं आहे, अशी माहिती वरपे देतात.

विकासकामे, जलसंधारण, रेल्वेचे काम अशा विविध कामांमध्ये तर सुप्रियाताई देशात आघाडीवर आहेत. त्यामुळे ज्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही, ज्या राज्यसभेत खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत अशांनी बारामती लोकसभेचा गड उद्ध्वस्त करण्याची भाषा करू नये. बारामती लोकसभेतील नागरिक सुजाण आहेत आणि बावनकुळेंचं गड उद्ध्वस्त करणारं विधान त्यांना हास्यास्पद वाटतं, असे मत वरपे यांनी व्यक्त केले आहे.

निर्मला सितारामन यांना जर लोकसभेवर निवडून यायचं असेल तर त्यांनी बारामती लोकसभा मतदार संघाचा अभ्यास करावा याचा निश्चित त्यांना फायदा होईल.