जेवणात थुंकी आणि लघवी मिसळणाऱ्यांविरोधात योगी सरकारकडून कडक कारवाई

0
40

लखनऊ,दि. 15 (पीसीबी)
दुकानांच्या पाट्यावर हॉटेल मालक आणि चालक यांचे नाव टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता जेवणात थुंकी आणि लघवी मिसळणाऱ्यांविरोधात योगी सरकारकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी उत्तर प्रदेश सरकार एक नवा अध्यादेश आणण्याची तयारी करत आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानंतर गृह, अन्न व नागरी पुरवठा आणि विधी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक मंगळवारी पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योगी सरकार दोन अध्यादेश आणण्याच्या तयारीत आहे. “छद्म आणि सद्भाव विरोधी कृती आणि थुंकण्यावर प्रतिबंध, २०२४” आणि “उत्तर प्रदेश अन्न दूषित करण्यास प्रतिबंध (ग्राहकांचा जाणून घेण्याचा अधिकार) अध्यादेश, २०२४” हे दोन अध्यादेश आणले जाणार आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्हीही अध्यादेशाच्या माध्यमातून फौजदारी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. मागच्या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये अन्नात भेसळ झाल्याची काही प्रकरणे समोर आली होती. काही प्रकरणात जेवणात थुंकी आणि मानवी लघवी मिसळल्याचेही समोर आले होते. योगी आदित्यनाथ सरकारने हॉटेल चालकांची नावे आणि त्यांचे पत्ते हॉटेलच्या बॅनरवर लिहिण्याचे आदेश दिल्यानंतर ही प्रकरणे समोर आली होती.

सरकारने सांगितले की, हॉटेल चालकांची नावे आणि हॉटेल जे चालवत आहेत, त्यांची नावे जाहीर करण्याचा निर्णय याआधीच जाहीर केलेला आहे. आता या नव्या अध्यादेशाच्या माध्यमातून अन्नात थुंकी किंवा मानवी मुतारी मिसणाऱ्यांविरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हे दोन्ही अध्यादेश एकमेकांशी संबंधित असतील. अन्नपदार्थ कुठे तयार केले जात आहेत, त्याचा दर्जा काय? हे जाणून घेण्याचा ग्राहकाचा अधिकार असेल.

अन्नपदार्थात भेसळ होण्याच्या घटना
१) १३ सप्टेंबर रोजी गाझियाबादमध्ये एका ज्यूस दुकानदाराला जमावाने मारहाण केली होती. ज्यूसमध्ये लघवी मिसळून ग्राहकांना घाणेरडे ज्यूस प्यायला दिल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला.

२) १२ सप्टेंबर रोजी सहारनपूरमधील एका हॉटेलमधील तरूण पिठावर थुंकून रोटी बनवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर पोलिसांनी सदर तरुणावर कारवाई केली होती.

३) २३ सप्टेंबर रोजी शामली येथे ज्यूस बनवत असताना विक्रेता त्यात थुंकल्याचे दिसून आले होते. याही प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.