जेजुरीसह महाराष्ट्रातील सर्व देवस्थाने सनदधारक गुरव पुजाऱ्यांच्या ताब्यात द्या !राष्ट्रीय गुरव समाज महासंघ

0
407

राष्ट्रीय गुरव समाज महासंघाची मागणी

पुणे, दि. 31(पीसीबी) –
जेजूरी खंडोबा देवस्थान मंदिराच्या विश्वस्त समितीवर अलीकडे झालेल्या नेमणुकांवरून वाद निर्माण झाला आहे. अशा नेमणुकांमध्ये राज्य शासनाने किंवा कुठल्याही प्रकारचा राजकीय पक्षाने हस्तक्षेप करू नये. कारण महाराष्ट्रातील बहुतांश मंदिरांमध्ये शेकडो वर्षापासून पूजाअर्चा करण्याचा व मंदिर व्यवस्थापन करण्याचा सनदधारक सेवाधारी गुरव समाजाचा अनुभव आहे. मंदिराचे व्यवस्थापन करणे हे राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तींचे काम नसून अशी सर्व मंदिरे शेकडो वर्षापासून मंदिर व्यवस्थापनात तज्ञ असणाऱ्या गुरव पुजाऱ्यांच्या ताब्यात द्यावीत, अशी आग्रहाची मागणी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाने केली.

यासाठी मुंबई पब्लिक ट्रस्ट कायदा आणि इतर नियमांमध्ये ताबडतोब सुधारणा करावी, अन्यथा समस्त गुरव समाज तीव्र आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे अध्यक्ष विजयराज शिंदे, संघटक डॉ नितीन ढेपे, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर आणि पदाधिकाऱ्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

महाराष्ट्रामध्ये हजारो देवस्थाने असून मागील शेकडो आणि हजारो वर्षांमध्ये त्यांची व्यवस्था वेगवेगळ्या राजव्यवस्थेमध्ये गुरव, जंगम, ब्राह्मण आणि इतर सेवेकरांच्या माध्यमातून लावण्यात आलेली होती. २५ ते ३० वर्षांमध्ये जेजुरी मंदिर ट्रस्टमध्ये गुरव समाजाचा समावेश नाही. सध्या चालू असलेला वाद हा स्थानिक विरुद्ध बाहेरचे असा आहे. मंदिर समितीवर स्थानिक लोकांची नेमणूक नक्कीच व्हावी, पण ती गुरव समाजातूनच व्हावी आणि किमान पन्नास टक्के विश्वस्त हे सनदधारी गुरव समाजातून निवडले जावेत, अशी आमची आग्रही मागणी आहे, असे यावेळी बोलताना राष्ट्रीय गुरव समाज महासंघाने म्हटले आहे.