जेएनपीटी बंदरामुळे बाधित झालेल्या हनुमान कोळीवाडा, नवीन शेवामधील ग्रामस्थांचे पुनर्वसन करा

0
162

जेएनपीटीचा प्रस्तावाला मान्यता द्या, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – जेएनपीटी बंदरामुळे बाधित झालेल्या हनुमान कोळीवाडा, नवीन शेवामधील ग्रामस्थांचे शासनाने तयार केलेल्या करारानुसार पुनर्वसन करावे. ग्रामस्थांनी जेएनपीटी टाऊनशिप आणि नजीकच्या कस्टम इमारतीला लागून असलेल्या 17.28 हेक्टर जमिनीला तर नवीन शेवाच्या ग्रामस्थांनी बोकडविराला लागून असलेल्या अतिरिक्त 23 हेक्टर जमिनीला प्राधान्य दिले आहे. त्यांना ही जागा देण्याबाबतचा प्रस्ताव जेएनपीटीने पाठविला आहे. त्याला तत्काळ मान्यता देण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.

याबाबत खासदार बारणे यांनी केंद्रीय जहाज व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली. त्यांना ग्रामस्थांची मागणी आणि जेएनपीटीने पाठविलेल्या प्रस्तावाची माहिती देत मंजुरी देण्याची विनंती केली. त्याबाबत सविस्तर निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मावळ मतदारसंघातील हनुमान कोळीवाडा आणि नवीन शेवा गावाच्या पुनर्वसनाच्या अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. जेएनपीटी बंदर आणि लगतच्या बांधकामासाठी संपादित केलेल्या जमिनीवर हे गाव वसलेले होते. बंदरे, जेएनपीटी बंदरांच्या स्थापनेपूर्वी हनुमान कोळीवाडा आणि नवीन शेवा गावातील रहिवासी शेती, मासेमारी, दुग्धव्यवसाय आणि फळशेती यातून आपली उपजीविका करत होते. हा परिसर आंबा आणि काजूच्या झाडांनी समृद्ध आहे. जे उत्पन्नाचे प्राथमिक स्त्रोत होते.

भूसंपादनानंतर शेवा गावाचे नवीन शेवा आणि हनुमान कोळीवाडा असे दोन भाग झाले. 1976 च्या एमआरपीडीपी कायद्यानुसार 617 कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले. 23 मे 1985 रोजी एनएसपीटी बंदर व्यवस्थापन, सरकारी अधिकारी प्रतिनिधी आणि शेवा गावातील रहिवाशांनी बोकडवीरा उरणजवळील शेवा गावात 33.64 हेक्टर (82.70 एकर) आणि बोरी पखाडीत शेवा कोळीवाडगावासाठी (आता हनुमान कोळीवाडा) अतिरिक्त 17.28 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याचे मान्य केले होते.

गेली 37 वर्षे हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थ केवळ 1.75 हेक्टर जमिनीवर राहत आहेत आणि नवीन शेवाचे ग्रामस्थ 10 हेक्टर जमिनीवर राहत आहेत. ज्याला “ट्रान्झिट कॅम्प” हनुमान कोळीवाडा आणि नवीन शेवा येथील रहिवासी असे नाव देण्यात आले आहे. रहिवाशी चार दशकांपासून पुनर्वसनाची वाट पाहत आहेत. त्यांच्या मागण्या माफक आणि जेएनपीटी आणि सरकारच्या आवाक्यातल्या आहेत. हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थ ज्या 1.75 हेक्टर जमिनीवर राहतात. त्यामध्ये वाळवी आल्याने ग्रामस्थांची घरे, कपडे व इतर मौल्यवान वस्तू दिवसेंदिवस खराब होत आहेत.

हनुमान कोळीवाड्यातील ग्रामस्थांनी जेएनपीटी टाऊनशिप आणि नजीकच्या कस्टम इमारतीला लागून असलेल्या 17.28 हेक्टर जमिनीला पसंती दिली आहे आणि नवीन शेवाच्या ग्रामस्थांनी बोकडविराला लागून असलेल्या अतिरिक्त 23 हेक्टर जमिनीला प्राधान्य दिले आहे. जे त्यांच्या पुनर्वसनासाठी एक आदर्श जागा असेल असे त्यांना वाटते. ही जमीन त्यांना लवकरात लवकर पुनर्वसनासाठी उपलब्ध करून द्यावी. पुनर्वसनासाठी पात्र असलेल्या सर्व 617 कुटुंबांना आधी मान्य 256 भूखंड हनुमान कोळीवाडा आणि 361 भूखंड नवीन शेवा देण्यात यावे. त्याबाबतच्या जीएनटीपीच्या प्रस्तावाला मान्यता देण्याची आग्रही मागणी खासदार बारणे यांनी केली.