सांगवी, २८ मे – संपूर्ण महाराष्ट्रासह पिंपरी-चिंचवड परिसरातही अवकाळी पावसाने जोर धरलेला असताना, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध भागांमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष पाहणी दौरा करण्यात आला. या पाहणी दौऱ्यादरम्यान पावसामुळे झालेली हानी, साचलेले पाणी, रस्त्यांवरील खड्डे, नाल्यांची स्थिती आणि स्ट्रॉम वॉटर लाईनचे अपूर्ण काम अशा विविध मुद्द्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
आ. शंकर जगताप यांनी नवी सांगवी व जुनी सांगवी परिसरातील नाले, स्ट्रॉम वॉटर लाईन व रस्त्यावर साचणाऱ्या पाण्याची स्थिती जाणून घेतली. एम.एस. काटे चौक, इंद्रप्रस्थ चौक येथील नाल्यांच्या स्वच्छतेबाबत प्रत्यक्ष पाहणी करत स्वच्छता व प्रवाह सुरळीत होण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश दिले.
त्याचप्रमाणे, इंद्रप्रस्थ चौक ते माहेश्वरी चौक मार्गावर असलेल्या खड्ड्यांची, खचलेल्या काँक्रीटच्या भागांची आणि खराब चेंबर्सची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जुनी सांगवी व बालाजी लॉन्स परिसरात साचणाऱ्या पाण्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्ट्रॉम वॉटर लाईनचे अपूर्ण काम तत्काळ पूर्ण करावे, असा आग्रह त्यांनी धरला.
शहरातील अनेक भागांत साचणारा कचरा वेळेवर गोळा करणे, त्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि रस्त्यांच्या कडेने पडलेला राडारोडा त्वरित हटवण्याबाबतही त्यांनी आरोग्य विभागाला निर्देशित केले.
या दौऱ्यात आमदार जगताप यांनी प्रत्येक प्रभागातील कामांची सद्यस्थिती आणि काम पूर्ण झाल्यानंतरची छायाचित्रांसह माहिती सादर करण्याचे आदेश दिले, जेणेकरून प्रशासनाच्या कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता राहील.
या दौऱ्यात कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे, स्थापत्य उपअभियंता कोटकर, ड्रेनेज विभागाचे शोएब शेख आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी जिटे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाहणी दौऱ्यावेळी माजी महापौर माई ढोरे, माजी नगरसेविका शारदा सोनवणे, माजी नगरसेवक संतोष कांबळे, मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, जिल्हा उपाध्यक्ष जवाहर ढोरे, तसेच हिरेन सोनवणे, आप्पा ठाकर, वैभव ढोरे, युवराज ढोरे, शाहरुख सय्यद, कृष्णा भंडारकर, दिलीप तनपुरे, प्रदीप झांजुर्णे, संजय मराठे, साई कोंढरे, संदीप दरेकर, राजू नागणे, शैलेश जाधव, मनीष रेडेकर, अमित घोडसाड, लक्ष्मण कमलाकर आणि इतर पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.