जुन्या भांडणाचा राग, चोरीच्या संशयावरून दारू पिण्यासाठी सोबत घेऊन गेले आणि तिथेच…..

0
73

शिरगाव, दि. 29 (पीसीबी) : पानटपरीमध्ये झालेल्या चोरीचा संशय तसेच जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन जणांनी मिळून एका तरुणाचा खून केला. ही घटना रविवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी सात ते सोमवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी दहा या दरम्यान मावळ तालुक्यातील दारूंब्रे येथे घडली.

अक्षय नरेंद्र सोरटे (वय २८, रा. दारुंब्रे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील नरेंद्र किसन सोरटे (वय ५२, रा. दारुंब्रे) यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संग्राम उर्फ नामदेव मारुती सोरटे (वय ३२) आणि नवनाथ वाघोले (वय ३४, दोघे रा. दारुंब्रे) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नामदेव सोरटे याची पानटपरी आहे. तर, आरोपी वाघोले हा त्याच्याकडे कामाला आहे. एक महिन्यापूर्वी आरोपीच्या पानटपरीमध्ये चोरी झाली होती. मयत अक्षय याने ही चोरी केली असावी, असा संशय आरोपींचा होता. त्यातच आरोपी वाघोले याच्या आई आणि बहिणीला काहीतरी बोलल्याच्या कारणावरून वाघोले आणि मयत अक्षय याची भांडणे झाली होती. या रागातून दोन्ही आरोपींनी मयत अक्षय याला दारू पिण्यासाठी आरोपी सोरटे याच्या सुरू असलेल्या बंधकामाजवळ नेले. तेथे अक्षयला जबर मारहाण करत त्याचा खून केला. तसेच अक्षयचा मृतदेह बाजूला पडीक असलेल्या शेतात नेऊन टाकला. शिरगाव पोलिस तपास करत आहेत.