जुन्या बसेसमध्ये दारुच्या बाटल्या, कंडोम, साड्या

0
3
  • तब्बल २० रक्षक असूनही स्वारगेट बसस्थानकात सुरक्षेचा अभाव

दि. २६ ( पीसीबी ) – स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी बसस्थानकात धडक देत सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली. बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह वस्तू आढळल्याने, येथे सुरक्षेच्या नावाखाली गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वसंत मोरे यांनी थेट सुरक्षा रक्षकांवरच गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, बसस्थानकात २० सुरक्षा रक्षक असूनही अशा घटना घडतात, याचा अर्थ ते स्वतः या प्रकारात सामील आहेत. ते म्हणाले की, सुरक्षा रक्षकांची संमती असल्याशिवाय अशा घटना घडू शकत नाहीत. बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये मोठ्या प्रमाणावर कंडोम्स, महिलांच्या साड्या, अंतर्वस्त्र, मद्याच्या बाटल्या आणि बेडशीट सापडल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे येथे केवळ एकच घटना नाही, तर सतत असे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, बसस्थानकात घुसून सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, जर सुरक्षा रक्षक काही करत नसतील, तर त्यांची केबिन इथे असण्याची गरजच नाही.
वसंत मोरे यांनी थेट एसटी आगारप्रमुख आणि परिवहन मंत्र्यांवरही सवाल उपस्थित केले आहेत. सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित असतानाही, अत्याचारासारख्या घटना घडत असतील, तर हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले.
या घटनेबाबत आगारप्रमुख अनभिज्ञ असल्याचे सांगण्यात आले, त्यावर आक्रमक होत वसंत मोरे यांनी कारवाईची मागणी केली. जर सुरक्षा रक्षक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली नाही, तर कायदा हातात घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.