जीवंतपणी फोटो कोणी वापरावा हा माझा अधिकार – शरद पवार यांचा आक्रमक पवित्रा

0
325

पिंपरी, दि. ४ (पीसीबी)-राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर अजितदादांबरोबर आणखी आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यात आता नवा वाद सुरु झाला आहे. अजितदादांनी राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचे सांगितले आहे. तर आता शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केला त्यांनी माझा फोटो वापरु नये, फोटो कोणी वापरावा हा माझा अधिकार आहे, असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, ज्यांनी द्रोह केला, ज्यांच्याशी माझा आता वैचारिक मतभेद झाले आहेत, त्यांनी माझा फोटो वापरु नये, आपल्या जीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे, अशा शब्दांमध्ये अजित पवार यांना ठणकावले आहे.

पवार म्हणाले की, मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. त्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्याच पक्षाने माझा फोटो वापरावा, अन्य कुणीही माझा फोटो वापरु नये, शब्दांमध्ये शरद पवार यांनी अजितदादांना सुनावले आहे. त्यामुळे आता हा काका-पुतण्याचा वाद नेमकं काय वळण घेणार हे पाहावं लागणार आहे.
अजितदादांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या पक्षाची पूनर्बाधणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. गुरु पोर्णिमेच्या दिवशीच आपल्या पक्षबांधणीला साताऱ्यातून सुरुवात केली. त्यामुळे आता काका-पुतण्यांमधील तणाव कुठपर्यंत ताणला जाणार, हे पाहावं लागणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलैला अजित पवार यांनी राजकीय भूकंप केला. अजित पवार पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यांनी आपल्या स्वप्नातील डाव टाकताना कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी खबरदारी घेतल्याचे बोलले जात आहे. काही गडबड होऊ नये यासाठी तडकाफडकी शपथविधी आणि मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय भाजप-शिवसेनेला घ्यावा लागला.

अजित पवार यांनी बंडखोरीचा डाव टाकताना पुरेपूर काळजी घेतली असल्याचे बोलले जात आहे. पण अजित पवार यांचे बंड कायद्याच्या कात्रीत सापडणार का? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे. अजित पवार यांनी तडकाफडकी शपथ घेण्यावरुन देखील अनेक तर्क लावले जात आहेत.