जीपॅट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विद्यावेतन मिळवून देण्यासाठी मोठा लढा उभारणार: प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे

0
139

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – केंद्र सरकारने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून जीपॅट ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विद्यावेतन (स्टायपेंड) अचानकपणे बंद केली आहे. त्यामुळे अनेक होतकरू व गरजु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान होत आहे. पदव्युत्तर फार्मसीचा रिसर्च प्रोजेक्ट आणि इतर शैक्षणिक खर्च मोठा असतो. तो सर्वांना पेलला जात नाही. अशातच सरकारने हे विद्यावेतन अचानकपणे बंद केल्याने फार्मसी विद्यार्थी अडचणीत आले आहेत.

गेल्या वर्षभरात शेकडो ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट (जी पॅट) पात्र उमेदवारांना स्टायपेंडपासून वंचित ठेवण्यात आले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) देशभरातील एम फार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जीपॅट परीक्षा आयोजित करते. चाचणीसाठी पात्र ठरलेल्यांना दोन वर्षांसाठी १२,४०० रुपये मासिक विद्या वेतन मिळते. साधारणपणे, स्टायपेंड प्रवेशानंतर तीन महिन्यांनी जारी केला जातो.

प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सांगितले की, बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांना जी पॅट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मिळणारी विद्यावेतन (स्टायपेंड) मागील काही महिन्यांपासून मिळाली नसल्याने आम्ही सर्व विद्यार्थी हे आंदोलन करत आहोत. राज्यातील सुमारे ३००० उमेदवार दरवर्षी हि परीक्षा उत्तीर्ण होतात. मात्र गेल्या एक वर्षापासून जी पॅट पात्र उमेदवार विद्यावेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यावेतन हे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा आहे. मात्र मोदी सरकार या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अजिबात संवेदनशील नसुन देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) च्या माध्यमातून फार्मसीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या स्वरुपात विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळत आहे. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

जीपॅट बद्दल

१. २०१८ पर्यंत ही चाचणी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) द्वारे घेतली जात होती.
२. २०१९ मध्ये ही चाचणी आयोजित करण्याची जबाबदारी एनटीएकडे सोपवण्यात आली.
३. ही चाचणी संस्थांना फार्मसीमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी योग्य फार्मसी पदवीधरांची निवड करण्यास मदत करते.
४. जीपॅट ही तीन तासांची संगणक-आधारित ऑनलाइन चाचणी आहे आणि तिचे गुण सर्व AICTE-मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठे स्वीकारतात.