छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातील साजा विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी अत्यंत महत्वाचा ठरला
रायपूर, दि. ४ (पीसीबी) : लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपनं नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तीन राज्यांमध्ये भाजपनं विजय मिळवला. यातील दोन राज्यं काँग्रेसकडे होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तिन्ही राज्यांत २०१८ मध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला होता. त्या तिन्ही राज्यांत भाजपनं यंदा दणदणीत विजय मिळवला. हिंदू- मुस्लिम दंगलीत जिहादींकडून मारला गेलेल्या युवकाच्या वडिलांना म्हणजे ईश्वर साहू यांना भाजपने उमेदवारी देऊन आमदार केले.
राजस्थानात दर ५ वर्षांनी सत्ताबदल होतो. त्यामुळे तिथे भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित होतं. मध्य प्रदेशातही भाजपची स्थिती चांगली होती. पण छत्तीसगडमध्ये भाजपती सत्ता येईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. विशेष म्हणजे सर्वच एक्झिट पोल्स राज्यात काँग्रेस सरकार कायम राहणार असल्याचा दावा करत होते. गेल्या ५ वर्षांत अनेक पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेस वरचढ ठरली. त्यामुळे छत्तीसगड काँग्रेससाठी सुरक्षित गड बनला होता. पण भाजपनं काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला आणि ९० पैकी ५४ जागा जिंकल्या. तर काँग्रेसला ३५ जागांवर समाधान मानावं लागलं.
छत्तीसगडच्या बेमेतरा जिल्ह्यातील साजा विधानसभा मतदारसंघात सर्वात आश्चर्यकारक निकाल नोंदवला गेला. ईश्वर साहू यांनी भूपेश बघेल सरकारमध्ये कृषी मंत्री असलेल्या रविंद्र चौबे यांचा पराभव केला. चौबे सात वेळा आमदारकी जिंकले आहेत. तर साहू याआधी एकदाही निवडणूक लढवलेली नाहीत. साहू यांना भाजपनं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं. त्यांना १ लाख १ हजार ७८९ मतं मिळाली. तर चौबे यांना ९६ हजार ५९३ मतं मिळाली. साहू ५ हजार १९६ मतांनी जिंकले.
बेमेतरा आणि कवर्धामध्ये दोन गटांमध्ये तेढ निर्माण होऊन हिंसाचार उफाळला होता. धर्मांतरचा विषयही चर्चेत होता. यावरुन भाजपनं काँग्रेसला घेरलं. त्यामुळेच भाजपनं बेमेतरामधील साजा मतदारसंघातून साहू यांना तिकिट दिलं. ईश्वर साहू यांचा मुलगा दंगलीमध्ये मारला गेला होता. साहू यांच्यासाठी दस्तुरखुद्द अमित शहांनी रॅली केली होती. इश्वर साहू केवळ उमेदवार नाहीत, तर न्यायाच्या लढाईचे प्रतीक आहेत. भाजप सत्तेत आल्यास त्यांच्या मुलाचे मारेकरी तुरुंगात असतील, असं शहा निवडणूक प्रचारावेळी म्हणाले होते.
एप्रिल २०२३ मध्ये साजा विधानसभा मतदारसंघात दंगल उसळली. एका शाळेत झालेल्या मारहाण प्रकरणानं धार्मिक वळण घेतलं. हिंसाचार उसळला आणि त्यात ३ जण मारले गेले. त्यात इश्वर साहूंचा मुलगा भुवनेश्वर साहूंचा समावेश होता. बघेल सरकारनं साहू कुटुंबाला १० लाख रुपये आणि सरकारी नोकरी देऊ केली. पण साहूंनी नकार दिला. त्यानंतर भाजपनं त्यांना विधानसभेचं तिकिट दिलं.