जिल्ह्याला मिळेना पालकमंत्री; विविध विकासकामे, उद्घाटने रखडली

0
288

पिंपरी, दि. ५ (पीसीबी) – 21 आमदार आणि चार खासदार असलेल्या पुणे जिल्ह्याला मागील दोन महिन्यांपासून पालकमंत्री नाही. त्यामुळे विविध विकास कामे, त्याची उद्घाटने, भूमीपूजने रखडली आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी चौकांमध्ये टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले सुंदर शिल्प पडद्याने झाकून ठेवावे लागले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार 29 जून 2022 रोजी कोसळले. त्यानंतर 30 जून रोजी शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. त्यानंतर तब्बल सव्वा महिन्यांनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. विस्तार होऊन आता एक महिना पूर्ण होत आला. तरीही, जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले नाहीत. पालकमंत्री नसल्याने विविध विकास कामे रखडली आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु, आपण पुण्याचे पालकमंत्री होणार नसल्याचे स्पष्ट सांगत खुद्द फडणवीस यांनीच त्या चर्चेला पूर्णविराम दिला. पुणे जिल्ह्यातून कोथरुडचे प्रतिनिधीत्व करणारे एकमेव चंद्रकांतदादा पाटील मंत्रीमंडळात आहेत. त्यामुळे आता पाटीलच पुन्हा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होणार का, हे पाहणे महत्वाचे आहे.

कोरोना महामारी, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील रखडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवट सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे जिल्हा परिषद, पुणे, खडकी, देहूरोड अशी तीन कॅन्टोमेंट बोर्ड यासह विविध नगरपरिषदा, नगरपंचायती, पंचायत समित्यांमध्ये लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात नाही. प्रशासकांची नियुक्ती केली आहे. लोकनियुक्त सभागृह नसल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यातच जिल्ह्याला पालकमंत्रीही नसल्याने अनेक विकास कामे रखडली आहेत. विविध विकासकामांची उद्घाटने, भूमीपूजनेही रखडली आहेत. प्रशासकीय राजवट असल्याने आणि पालकमंत्री नसल्याने नेमके कोणाच्या ऐकायचे यामध्ये अधिका-यांचीही कोंडी होताना दिसत आहे.