जिल्ह्यात मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

0
115

जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने मतमोजणी केंद्रात व त्याच्या १०० मीटर परिसरात ४ जून रोजी पहाटे ००.०१ ते मतमोजणी संपेपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मनाई आदेश निर्गमित केले आहे.

मावळ लोकसभा मतदार संघाची मजमोजणी बालेवाडी स्टेडीयम, पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एफसीआय गोडावून कोरेगांव पार्क तर शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी स्टेट वेअरहाऊस, गोदाम क्र., ब्लॉक पी-३९, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ रांजणगाव (कारेगांव), ता. शिरूर येथे होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मतमोजणी केंद्रात आणि १०० मीटर परिसरात सदर वेळेत भ्रमणध्वनी, लॅपटॉप, आयपॅड, मॅचबॉक्स, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, कोणत्याही प्रकारची शस्त्रे सुरक्षेच्या कारणास्तव मतमोजणी कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस जवळ बाळगणे व वापरण्यास फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये मनाई करण्यात आली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ आणि भारतीय दंड विधान कायद्यातील कलम १८८ प्रमाणे दंडनीय कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.