जिल्ह्यात मंत्रीपदासाठी कोणाला संधी ?

0
100

सुनील शेळके, माधुरी मिसाळ, महेश लांडगे यांची नावे चर्चेत

पिंपरी, दि. 1३ (पीसीबी) : देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या शनिवारी सायंकाळी होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. पुणे जिल्ह्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नंतर आता सहा आमदारांची नावे चर्चेत असून नेमकी कोणाचे नशिब उजळणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रादेशिक समतोल आणि तीन पक्षांचा ताळमेळ सांभाळून हे वाटप होणार आहे. ४२ पकी भाजपकडे २२, शिंदेंच्या शिवसेनेला १२ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला १० मंत्री असे साधारण वाटप ठरलेले आहे. यापूर्वी पुणे जिल्ह्यातून अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे पाटील, दत्ता भरणे हे राष्ट्रवादीचे तर चंद्रकांत पाटील यांना भाजपमधून संधी मिळाली होती. राष्ट्रवादी एकत्र असताना अजितदादा हेच पालकमंत्री होते, भाजपकडून चंद्रकांत पाटील यांनी ही जबाबदारी सांभळली होती. आता पालकमंत्री दोन पैकी कोणते दादा होणार यावरही संघर्ष आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी ५ डिसेंबरला झाला. आता उद्या कोण कोण शपथ घेणार ती नावे चर्चेत आहेत. भाजपच्या गोटातून चंद्रकांत पाटील यांचे नाव निश्चित मानले जाते. त्याच बरोबर सलग तीन टर्म आमदार असलेल्या महिला म्हणून माधुरी मिसाळ यांनाही संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा सत्ता पाहिजे म्हणून राज्यमंत्री पदावर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याही नावाला होकार मिळू शकतो. फडणवीस यांचे अत्यंत निष्ठावंत तसेच मातंग समाजातील म्हणून विधान परिषदेचे तरूण आमदार अमित गोरखे यांचेही नाव चर्चेत असल्याचे समजले. चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता लाखाच्या फरकाने निवडूण आलेले त्यांचेच धाकटे बंधू शंकरशेठ जगताप यांचे नाव थेट दिल्ली दरबारात असल्याची खबर आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजितदादा यांच्या बरोबर सलग आठ वेळा आमदार आणि ३० वर्षे मंत्री राहिलेले दिलीप वळसे यांना पुन्हा संधी मिळणार आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी लाखाच्या फरकाने अत्यंत चिकाटीने ही जागा दुसऱ्यांदा जिंकल्याने अजित पवार त्यांच्यावर फिदा आहेत. प्रचार काळात मावळात लाल दिवा देणार अशी ग्वाही त्यांनी दिली होती. आता शेळके यांचे नाव स्पर्धेत अंतिम असल्याने फक्त शिक्कामोर्तब बाकी असल्याचे समजले.
शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याचे आमदार विजय बापू शिवतारे यांचे नाव खुद्द एकनाथ शिंदे यांनी निश्चित केले आहे. शिंदे यांचे पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेषतः पुणे जिल्ह्यात पवार यांना शह देणाऱ्या निष्ठावंतामध्ये त्यांचे नाव आहे.