जिल्हाधिकाऱ्यांनी मला रुममधे बोलावले, मी नकार दिला म्हणून…

0
70

सुहास दिवसे यांच्यावर पूजा खेडकर यांचा लैंगिक छळाचा आरोप

दि. ३१ जुलै (पीसीबी) नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वतोमुखी चर्चेचा विषय झालेल्या पूजा खेडकर प्रकरणात बुधवारी एक नवा ट्विस्ट आला. प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गंभीर आरोप झाले होते. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीची फसवणूक करुन पूजा खेडकर अधिकारी झाल्याचे सांगितले जात होते. यानंतर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. मात्र, पूजा खेडकर या फरार आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी झाली. यावेळी पूजा खेडकर यांचे वकील ॲडव्होकेट माधवन यांनी एक गंभीर आरोप केला. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केल्याचे ॲडव्होकेट माधवन यांनी म्हटले.

ॲडव्होकेट माधवन यांनी न्यायालयात पूजा खेडकरची बाजू मांडताना म्हटले की, याप्रकरणात गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई सुरु झाली आहे. युपीएससीकडून दररोज पत्रकारपरिषद घेतली जात आहे. पूजा खेडकर कधीच प्रसारमाध्यमांसमोर गेल्या नाहीत. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या सांगण्यावरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. या सुहास दिवसे यांच्याविरुद्ध पूजाने लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. सुहास दिवसे यांनी पूजाला त्यांच्या खोलीत यायला सांगितल होते. मात्र, पूजाने त्याला नकार दिला, असा दावा खेडकर यांचे वकील ॲडव्होकेट माधवन यांनी केला.

ॲडव्होकेट माधवन यांनी न्यायालयात भक्कमपणे पूजा खेडकरची बाजू मांडताना अनेक खळबळजनक दावे केले. त्यांनी पूजा खेडकरची बाजू मांडताना म्हटले की, पूजा खेडकर हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आता ते म्हणत आहेत की, माझी पोलीस कोठडीत चौकशी झाली पाहिजे. पण मी काय केलं आहे? सरकारी यंत्रणांनी माझ्यावर गुन्हा दाखल करताना इतकी तत्परता का दाखवली. मला माझ्या बचावाची बाजू मांडण्यासाठी पूर्ण संधी मिळाली पाहिजे, असे पूजा खेडकरने म्हटले. मात्र, माझ्यावर गुन्हेगारी खटला दाखल केल्याने आणि मला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याने मी माझा बचाव करण्यास असमर्थ आहे. त्यासाठी मला अटकपूर्व जामिनाची गरज आहे. मला अटक करण्यास स्थगिती दिल्यास मला बचावाची संधी मिळेल, असे पूजा खेडकरने वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले.
माझ्यावर गुन्हा दाखल होताच प्रसारमाध्यमांनी माझ्याविरोधात मोहीम सुरु केली. मी प्रसारमाध्यमांशी बोलायला कधीच गेले नव्हते. कारण माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असेही पूजा खेडकरने वकिलांमार्फत न्यायालयात सांगितले.

ॲडव्होकेट माधवन न्यायालयात युक्तिवाद करताना पूजा खेडकर या फ्रॉड नसून फायटर असल्याचे म्हटले. दरवेळी तिला परीक्षार्थी होण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. ती दिव्यांग आहे. तिचे आईवडील घटस्फोटित आहेत. ती महिला आहे. तिच्यावर गुन्हा का दाखल केला गेला. कारण ती दिव्यांग आहे म्हणून की ती महिला आहे म्हणून?,असे सवाल खेडकर यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर उपस्थित केले.

  • सुहास दिवसे यांच्यावर पूजा खेडकर यांचा लैंगिक छळाचा आरोप