जिलेटिनच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

0
202

फुटींग होलचे काम करणाऱ्या कामगाराचा जिलेटिनच्या स्फोटात मृत्यू झाला. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 27) सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील करंजविहीरे गावातील नवीन स्टोन क्रशर प्लांटवर घडली.

राजेश कुशवाह असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर रमेश मोतीलाल कोल (वय 35, रा. मध्य प्रदेश), अलोक कोल हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. स्वप्निल बाबाजी कोळेकर, निलेश सदाशिव कोळेकर, बाबाजी रामदास कोळेकर (तिघे रा. करंजविहीरे, ता. खेड), रवींद्र अरुण तोत्रे (रा. वडगाव पाटोळे, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कॉम्प्रेसर ट्रॅक्टरने फुटींग होल घेण्याचे काम करतात. त्यांच्याकडे रमेश कोल, आलोक कोल आणि राजेश कुशवाह हे काम करत होते. आरोपींनी त्यांच्याकडे जिलेटीन देखील बाळगले होते. त्यांनी कामगारांना कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांच्याकडून सदोष कॉम्प्रेसरने फुटींग होलचे काम करून घेतले. शनिवारी सकाळी सव्वा दहा वाजताच्या सुमारास ट्रॅक्टरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. तसेच त्यावरील जिलेटीनचा देखील स्फोट झाला. यामध्ये कामगार राजेश कुशवाह यांचा मृत्यू झाला. तर आलोक कोल आणि रमेश कोल हे दोघे गंभीर जखमी झाले. पोलिसांनी रवींद्र तोत्रे यास अटक केली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.