जिम ट्रेनरने मागितली पाच लाखांची खंडणी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
4907

चाकण, दि. २५ (पीसीबी) – आपल्याकडे खासगी व्हिडीओ असल्याचे सांगून ते व्हायरल करण्याची धमकी देत जिम ट्रेनरने तरुणाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने जिम ट्रेनरला अटक केली आहे. ही घटना 16 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत मेदनकरवाडी येथे घडली.

मिथुन सोपान मुंगसे (वय 36, रा. मेदनकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या आरोपी जिम ट्रेनरचे नाव आहे. याप्रकरणी दर्शन रवींद्र मेदनकर (वय 21, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दर्शन हे ज्या जिममध्ये व्यायामासाठी जातात त्या जिममध्ये आरोपी मिथुन हा ट्रेनर म्हणून काम करत होता. जिममध्ये मित्रांसोबत बोलताना दर्शन यांचा पेन ड्राइव्ह हरवला असून त्यात आपले फोटो व व्हिडीओ असल्याचे मिथुन याला समजले.

त्यानंतर मिथुन याने दर्शन यांना मेसेज करून त्याच्याकडे दर्शन यांचे खासगी व्हिडीओ असल्याचे सांगितले. ते व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे देण्यास नकार दिल्याने मिथुन याने फिर्यादीस संपवून टाकण्याची धमकी दिली. व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत दर्शन यांच्याकडून जबरदस्तीने दोन वेगवेगळ्या युपीआय आयडीवर 14 हजार रुपये घेतले. त्यानंतर आणखी पैशांची मागणी केल्यानंतर दर्शन यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली.

पोलिसांनी दर्शन यांच्याकडून माहिती घेतली. त्यामध्ये त्यांनी ज्या क्यूआर कोडवर पैसे होते, त्या आधारे पोलिसांनी आरोपीला शोधले. त्यानंतर मिथुन याला ताब्यात घेतले असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपीला अटक करून पुढील कारवाईसाठी चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, पोलीस अंमलदार किरण काटकर, प्रदीप गोडांबे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी यांनी केली.

नागरिकांकडे कोणत्याही प्रकारे खंडणीची मागणी होत असल्यास त्यांनी खंडणी विरोधी पथकाला (7517751793 / [email protected] / [email protected]) माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी केले आहे.