पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर फाडल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरात मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल (बुधवार, २९ मे) महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या परिसरात मनूस्मृती दहन करत आंदोलन केलं होते. यावेळी, जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून यावर जोरदार प्रतिक्रिया देत राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार आव्हाड यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविला. आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला. आव्हाडांवर कडक कारवाई करून अटकेची मागणी करण्यात आली. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, रुपेश पटेकर, के.के. काबळे, नितीन चव्हाण, प्रविण माळी, सखाराम मटकर, नारायण पठारे, आकाश सागरे, रोहन काबळे, मामु शेख, रोहीदास शिवणेकर, गणेश वाघमारे, शिशिर महाबळेश्वर , आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.










































